नव्या फॅसिझमविरुध्द साहित्यिकांनी वैचारिक लढा उभारावा : डॉ.भालचंद्र मुणगेकर
By मेहरून नाकाडे | Published: December 2, 2023 05:27 PM2023-12-02T17:27:57+5:302023-12-02T17:44:40+5:30
गोपाळबाबा वलंगणकर साहित्यनगरी ( रत्नागिरी ) : ‘हिंदू राष्ट्र’ हा भारतातील ‘नव्या फॅसिझम’चा आविष्कार आहे. नव्या फॅसिझम हे लाेकशाहीला घातक असून, ...
गोपाळबाबा वलंगणकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : ‘हिंदू राष्ट्र’ हा भारतातील ‘नव्या फॅसिझम’चा आविष्कार आहे. नव्या फॅसिझम हे लाेकशाहीला घातक असून, धर्माच्या नावाने ताे रुजताे आहे. लाेकशाही बळकट करायची असेल, तर साहित्यिकांनी वैचारिक लढा उभारला पाहिजे. नव्या फॅसिझमविरुद्धच्या वैचारिकतेत साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डाॅ.भालचंद्र मुणगेकर शनिवारी येथे केली.
प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि एस.पी. हेगशेट्ये काॅलेज ऑफ आर्ट्स, काॅमर्स ॲण्ड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे रत्नागिरीत आयाेजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष जी.के. ऐनापुरे, स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, नवनिर्माण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, डाॅ.अलिमियाॅ परकार, युयुत्सू आर्ते, नवनिर्माण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर, महाविद्यालयाच्या प्राचार्या आशा जगदाळे उपस्थित होते.
या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अम्बुज यांच्या हस्ते करण्यात आले. डाॅ.मुणगेकर पुढे म्हणाले की, भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय, मैत्री, करुणा या मूल्यांवर आधारित जाती, वर्ग, लिंग, भेदविरहित, शाेषणमुक्त, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक भारत निर्माण करायचा आहे. त्या सर्वांनी या नवफॅसिझमविरुद्ध वैचारिक भूमिका घेऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.