रजिस्टर लिहिण्यावरून चिपळुणात ठेकेदार वेठीस

By admin | Published: May 25, 2016 10:04 PM2016-05-25T22:04:10+5:302016-05-25T23:33:00+5:30

मजूर सोसायटीची गळचेपी : रजिस्टर सापडली तीन वर्षांनी

Writing the register, contractor Vetitus in Chiplun | रजिस्टर लिहिण्यावरून चिपळुणात ठेकेदार वेठीस

रजिस्टर लिहिण्यावरून चिपळुणात ठेकेदार वेठीस

Next

चिपळूण : गुहागर तालुक्यातील मोडकाआगर, पालशेत, तवसाळ या प्रमुख राज्य मार्ग ४च्या किरकोळ दुरुस्तीचे काम २०१२मध्ये पूर्ण झाले. मात्र, बांधकाम विभागाने बिल न दिल्याने काम करणाऱ्या मजूर सोसायटीची गळचेपी सुरू आहे. काम सुरु असताना हरवलेली एमबी (रजिस्टर) तीन वर्षांनी सापडली. दरम्यान, त्या काळात असणाऱ्या शाखा अभियंत्यांची बदली झाल्याने आता रजिस्टर लिहायची कुणी? यावरून चालढकल केली जात आहे. हे काम करणाऱ्या पोटठेकेदाराची उपासमार होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूणच्या अंतर्गत २८ फेब्रुवारी २००९मध्ये मोडकाआगर, पालशेत, तवसाळ या रस्त्याचे किमी २१/०० ते किमी २१/६०० व किमी २३/४०० ते किमी २४/०० या धावपट्टीचे रुंदीकरण व किरकोळ दुरुस्ती करण्याच्या दोन वेगवेगळ्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या. हे काम सुरू असताना तत्कालीन शाखा अभियंता अबंदे यांनी प्रथम एमबी लिहिली. त्यानुसार २०१०मध्ये रनिंग बिलही काढण्यात आले. मात्र, त्यानंतर एमबी गहाळ झाली. दरम्यानच्या काळात दोन्ही भागाचे काम २०१२मध्ये पूर्ण झाले. परंतु, एमबी हरवली असल्याने ती लिहिली गेली नाही. याच काळात शाखा अभियंता अबंदे यांची बदली झाली.
त्यानंतर २०१५मध्ये चिपळूण बांधकाम विभागात एमबी सापडली. ही एमबी लिहून आपल्याला बिल मिळावे, यासाठी मजूर सोसायटीतर्फे प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. शिवाय आपण एमबी लिहिणार नाही. अबंदे यांनाच एमबी लिहायला सांगा, असे सांगण्यात आले. अबंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपली बदली झाली आहे. तिथे असणाऱ्या शाखा अभियंत्याकडून एमबी लिहून घ्या, असे सांगण्यात आले.
दोन शाखा अभियंत्यांच्या या चालढकलपणामुळे आजअखेर एमबी लिहून न झाल्याने चार वर्षे झाली तरी अद्याप बिलाचा पत्ता नाही. त्यामुळे मजूर सोसायटी व काम करणारे अडचणीत आले आहेत. तत्कालीन उपअभियंता व स्थानिक आमदार यांच्या कानावर वस्तुस्थिती घालण्यात आली. परंतु, पदरात निराशा पडली. ‘आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी आपली स्थिती झाल्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानी सांगितले.
याप्रकरणी आमदार सदानंद चव्हाण यांचीही दोन दिवसांपूर्वी भेट घेण्यात आली. आपल्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा संबंधित मजूर सोसायटी व पोटठेकेदार बाबू चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)

बांधकाम खात्याचा कारभार : बिल न देताच रक्कम अदा
बांधकाम खात्याचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मोडकाआगर, तवसाळ रस्त्याची २०१२मध्ये साईडपट्ट्या भरल्या व दुरुस्ती केल्यानंतर २०१४मध्ये याच रस्त्याच्या कामावर कारपेट व सीलकोट करण्यात आले. सुरुवातीला केलेल्या कामाचे बिल न देताच त्यानंतर केलेल्या कामाचे बिल काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या आडमुठ्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Writing the register, contractor Vetitus in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.