शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:48 PM2020-09-09T20:48:58+5:302020-09-09T20:50:16+5:30
शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
रत्नागिरी : शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या दोघांचीही निवड करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने, नीलम गोऱ्हे, प्रियांका चतुर्वेदी, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी आपल्या कार्यकौशल्याने पक्षात चांगला ठसा उमटवला आहे. अल्पावधीतच त्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केली आहे.
निवडणुकीच्या काळात पुण्याची जबाबदारी सामंत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना नेते म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्रीपद त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड झाली आहे.