पोफळीतील उपोषण लढ्याला यश
By admin | Published: May 13, 2016 11:58 PM2016-05-13T23:58:45+5:302016-05-13T23:58:45+5:30
सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णायक तोडगा
शिरगाव : कोयना प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांची महानिर्मिती कंपनीत होणारी ससेहोलपट, वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक याबाबत पोफळीतील कोयना संकूल प्रवेशद्वारासमोर केलेल्या उपोषण लढ्याला यश आले आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेत निर्णायक तोडगा काढण्यात आला आहे. यावेळी मुख्य अभियंता वसंत खोकले, व्यवस्थापकीय संचालक बिपील श्रीमाळी, मनोज रानडे, भाजप पाटण तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, नियोजन मंडळ सदस्य प्रताप शिंदे, राष्ट्रवादीचे सत्यजीत शेलार, रवींद्र शेलार, अनिल देसाई, बाळासाहेब शिंदे यांच्यासह दोन उपोषणकर्त्यांच्या बैठकीत चर्चा झाली.
या अनुषंगाने कार्यमुक्त करण्यात आलेल्या २८ बीटीआरआय प्रशिक्षणार्थींना परीक्षा उत्तीर्ण झाल्यास कुशल कारागीर प्रशिक्षण योजनेत समाविष्ट केले जाईल. अनुत्तीर्ण झाल्यास मासिक ६ हजार वेतनावर पाचवेळा उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, हे प्रशिक्षणार्थी काही अटींवर महानिर्मिती कंपनीत कार्यरत राहतील.
आजअखेर ९६ प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी १० हजारपर्यंत वेतन घेऊन महानिर्मितीच्या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करत आहेत. याबाबत शिष्टमंडळाने चर्चा करताच ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जाणीवपूर्वक अन्यायकारक वागणूक देणारे एस. एन. पोवार यांच्या चौकशीची मागणी नंदकुमार सुर्वे यांनी केली आहे. (वार्ताहर)
‘लोकमत’ची कात्रण
‘लोकमत’ने गेले तीन महिने सतत वस्तुनिष्ठ वृत्ताला प्रसिध्दी दिली. याबाबतची कात्रण एकत्र करुन बैठकीत ठेवण्यात आली. उपोषण कालावधीत दिलेल्या सहकार्याबाबत उपोषणकर्ते शैलेश शिंदे, कांबळे यांनी आभार मानले.