शिवछत्रपती पुरस्कारावर रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:13 PM2023-08-30T17:13:44+5:302023-08-30T17:15:22+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील याशिका शिंदे, आरती कांबळे, प्रणव देसाई आणि अपेक्षा सुतार या खेळाडूंना क्रीडा जगतातील मानाचा शिवछत्रपती राज्य ...

Yashika Shinde, Aarti Kamble, Pranav Desai and Preksha Sutar from Ratnagiri district have been awarded the Shiv Chhatrapati State Sports Award | शिवछत्रपती पुरस्कारावर रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांची मोहोर

शिवछत्रपती पुरस्कारावर रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांची मोहोर

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह्यातील याशिका शिंदे, आरती कांबळे, प्रणव देसाई आणि अपेक्षा सुतार या खेळाडूंना क्रीडा जगतातील मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गाैरविण्यात आले. एकाचवेळी चाैघांनी या पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पुणे येथील बालेवाडीत आयाेजित केलेल्या या पुरस्कार साेहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती हाेती. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील चाैघांनी या क्रीडा पुरस्कारावर आपली माेहाेर उमटवली. यामध्ये रत्नागिरी शहरातील  आरती कांबळे आणि अपेक्षा सुतार या खाे-खाे पटूंचा समावेश आहे. 

त्याचबराेबर चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील याशिका शिंदे हिने रायफल शुटींग क्रीडा प्रकारात तर संगमेश्वर तालुक्यातील काेंढ्ये येथील प्रणव देसाई याला दिव्यांग मैदानी स्पर्धेतील कामगिरीवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरीतील चारही खेळाडूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जाेरावर पुरस्कारावर आपले नाव काेरले आहे. त्यांचे नाव रत्नागिरीच्या इतिहासातील पानावर काेरले गेले आहे.

याशिका शिंदे

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कादवड गावातील याशिका विश्वजित शिंदे हिने रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात  पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे तिचे वडील व आत्या यांनाही एकाच वर्षी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. आता दत्ताराम शिंदे यांच्या दोन्ही मुलांनी व नातीने हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे. विश्वजित शिंदे यांना रायफल शूटिंग, तर नंदा देसाई यांना मल्लखांबमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आरती कांबळे

रत्नागिरीतील आरती कांबळे हिने खो-खो खेळामध्ये क्रीडा प्रकारातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळविला आहे. आरती रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी असून, इयत्ता सातवीत असल्यापासून खो-खो खेळत आहे. आत्तापर्यंत तिने राष्ट्रीय स्तरावरील अठरा स्पर्धेत यश संपादन केले आहे. तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे, संदीप तावडे, यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले आहे. शाळेपासून खो-खो खेळत असताना तिने कष्ट, चिकाटीतून यश संपादन केले आहे.

प्रणव देसाई

संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्ये येथील प्रणव प्रशांत देसाई याने मानाचा पुरस्कार पटकावला.  सध्या ठाणे येथे असणाऱ्या प्रणव देसाई याने सर्वप्रथम आपली मैदानी संघटनात्मक स्पर्धेची सुरुवात चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील दिव्यांग मैदानी स्पर्धेतून केली. त्याचे वडील प्रशांत देसाई यांनी प्रतिकूल स्थितीत त्याला पाठबळ दिले. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वेंकटेश करा, उदयराज कळंबे, संजय सुर्वे यांनी त्याला मार्गदर्शन केले.

अपेक्षा सुतार

रत्नकन्या अपेक्षा सुतार ही रा. भा. शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून, तिने पाचवीत असल्यापासून खो-खो खेळास सुरूवात केली. आत्तापर्यंत तिने २२ राष्ट्रीय, दोन आंतरराष्ट्रीय-  स्पर्धेतून यश संपादन केले आहे. खो-खो खेळातील नामवंत जानकी व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळविले आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या यशामुळे मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिला विनोद मयेकर, संदीप तावडे, पंकज चवंडे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. यशात आईवडिलांचे योगदान मोठे आहे.

Web Title: Yashika Shinde, Aarti Kamble, Pranav Desai and Preksha Sutar from Ratnagiri district have been awarded the Shiv Chhatrapati State Sports Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.