५ वर्षात लखपतींचे कोट्यधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:02 PM2019-04-05T23:02:36+5:302019-04-05T23:02:41+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे हे ठरले आहेत. ...
रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे हे ठरले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण १९ कोटी रूपये एवढी मालमत्ता नमूद केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना आपल्या सर्व मालमत्तेसह व्यक्तिगत माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. २८ मार्च ते ४ एप्रिल ही अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत इतर उमेदवारांबरोबरच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडकर, शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी अर्ज सादर केला आहे. यासोबत त्यांनी आपल्या मालमत्तेविषयीही माहिती सादर केली आहे.
या तीन उमेदवारांच्या मालमत्तेची तुलना करता या तिघांमध्ये सर्वाधिक संपत्ती निलेश राणे यांची असून त्यांच्या नावे एकूण संपत्ती १९ कोटी नमूद करण्यात आली आहे.
यापैकी जंगम मालमत्ता १२,४९,७५,२७७ इतकी तर स्थावर मालमत्ता ६,५४,७०,५०१ इतकी आहे. कर्ज ५,८६,०१,८६९ इतके नोंदविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावे दोन मर्सिडिज आणि दोन टोयॅटा गाड्या आहेत. तसेच १६५६.१० ग्रॅम ( ५५,७२,७७७ रूपये) इतके सोने आहे. तर २०१४ सालची त्यांची संपत्ती ४४.८९ लाख इतकी नोंदविली
आहे.
त्याखालोखाल विनायक राऊत यांची एकूण संपत्ती १३ कोटी १८ लाख नोंदविण्यात आली असून यापैकी जंगम मालमत्ता ३,८७,००,००० रूपये इतकी तर स्थावर मालमत्ता ३१,८७,२९८ रूपये इतकी आहे. कर्ज २८ लाख रूपये आहे. तसेच त्यांच्या नावे स्कॉपिओे ही एकच गाडी आहे. तसेच २२० ग्रॅम ( ६.५० लाख रूपये) इतके सोने आहे. त्यांची २०१४ सालची संपत्ती २.१६ लाख रूपये इतकी नोंदविली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांची एकूण संपत्ती १ कोटी ८४ लाख नोंदविण्यात आली असून यापैकी जंगम मालमत्ता १,८३,९२,५०९ रूपये इतकी तर स्थावर मालमत्ता २,३३,०७८ रूपये इतकी आहे. कर्ज ५१,५६,४४८ रूपये आहे. तसेच त्यांच्या नावे टाटा सफारी, ह्युंडाई अशा एकूण दोन गाड्या आहेत.
तसेच २५ ग्रॅम ( ५०,००० रूपये) एवढे सोने आहे. त्यांची २०१४ सालची संपत्ती ३० लाख रूपये इतकी नोंदविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.