या वर्षीही गंगेच्या स्नानापासून भाविक मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:52+5:302021-05-04T04:13:52+5:30
राजापूर : गतवर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने, राजापुरातील प्रसिद्ध गंगेच्या स्नानाची पर्वणी भाविकांना साधता येणार नाही. दरम्यान, ...
राजापूर : गतवर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने, राजापुरातील प्रसिद्ध गंगेच्या स्नानाची पर्वणी भाविकांना साधता येणार नाही. दरम्यान, गंगामाईचे आगमन होऊन तीन दिवस लोटले, तरी गंगाक्षेत्री भाविकांना प्रवेश देण्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने गंगापुत्रांसह भाविकांमध्येही संभ्रमावस्था आहे.
राजापूरच्या गंगामाईचे शुक्रवारी आगमन झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, उन्हाळे येथील गंगाक्षेत्रावर गंगामाईचे आगमन झाले आहे. गंगा आगमनाच्या काळात हजारोंच्या संख्येने भाविक स्नान करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. काेरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात सर्व धार्मिक क्षेत्रे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर गंगाक्षेत्रावर भाविकांना अद्याप तरी प्रवेशबंदी करण्यात आली नसली, तरी लवकरच प्रशासनाकडून तसे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात, तसेच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे गंगामाईचे आगमन झाले असले, तरी भाविकांना गंगेच्या स्नानापासून वंचित रहावे लागणार आहे. गतवर्षीही एप्रिल महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यावेळीही गंगाक्षेत्रावर भाविकांना बंदी घालण्यात आली होती. संपूर्ण गंगाक्षेत्राकडे जाणारे मार्ग प्रशासनाच्या आदेशानंतर बंदिस्त करण्यात आले होते. त्यामुळे गंगा आगमनानंतर भाविकांना तेथे स्नानासाठी जाता येणार नाही.