दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्यांच्या संख्येत यंदा घट
By admin | Published: August 17, 2016 10:07 PM2016-08-17T22:07:36+5:302016-08-17T23:11:52+5:30
उंच मनोरे रचण्यास मनाई : यंदा ३ हजार ५२७ हंड्या फुटणार; खेड तालुक्यात फुटणार सर्वाधिक दहीहंड्या
रत्नागिरी : ढाक्कूऽ माकूम... ढाक्कूऽ माकूम...च्या ठेक्यावर... डिजेच्या तालावर थिरकण्यासाठी बालगोपाळांना आता काही दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. २५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी अशा ३ हजार ५२७ दहीहंड्या बाधण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील दहीहंडीच्या संख्येत ३४ने घट झाली आहे, तर यंदाही उंचच उंच मनोरे रचण्यास मनाई असल्यामुळे काहीसा चाप बसणार आहे.
गोपाळकाल्याचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. परंतु सध्या या सणाचे पारंपरिक स्वरूप संपुष्टात आले आहे. त्यामुळे या सणाला व्यावसायिक रुप प्राप्त झाले आहे. परंंतु आता वीस फूट उंचीपेक्षा जास्त मनोरे रचण्यास मनाई आहे. त्याचबरोबर लहान मुलांना हंड्या फोडण्याला बंदी घालण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात वीस फुटापेक्षा अधिक उंचीवर दहीहंड्या बांधून स्पर्धा होत होत्या. त्यामुळे या स्पर्धांसाठी जिल्हाभरातून बालगोपाळाची अनेक मंडळे हंड्या फोड्यासाठी रत्नागिरीत येत असत. त्यामुळे या मानवी मनोऱ्याची नजाकत पाहण्यासाठी शहरात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. लोकांची गर्दी पाहून या सणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
अनेक राजकीय लोक प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावून स्पर्धा आयोजित करत आहेत. आता अल्पवयीन म्हणजे १८ वर्षांखालील मुलांना न्यायालयाने हंडी फोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सर्वच बालगोपाळ निराश झाले आहेत.
गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ५६१ हंड्या फोडण्यात आल्या होत्या, तर यंदा हंड्याची संख्या ३४ ने घटली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे ३ हजार ५२७ हंड्या बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये सार्वजनिक हंड्या ३८५ असून, खासगी दहीहंड्यांची संख्या ३ हजार १४२ इतकी आहे. रत्नागिरी शहरात सार्वजनिक ८ व खासगी ९०, रत्नागिरी ग्रामीण ९४ सार्वजनिक व ८६ खासगी, जयगड सार्वजनिक १६ व खासगी १६७, राजापूर सार्वजनिक ३५ व खासगी ६५, नाटे ४० सार्वजनिक ८५ खासगी, लांंजा ३७ सार्वजनिक व ७० खासगी, देवरुख ८ सार्वजनिक व ६० खासगी, संगमेश्वर ८ सार्वजनिक व १२० खासगी, सावर्डे ४ सार्वजनिक व १४० खासगी, चिपळूण १३ सार्वजनिक २९० खासगी, अलोरे ७ सार्वजनिक व खासगी ४८, गुहागरमध्ये १० सार्वजनिक, २२० खासगी, खेड सार्वजनिक २४ व खासगी ४५०, दापोली ३४ सार्वजनिक व ३२७ खासगी, मंडणगड येथे ६ सार्वजनिक व २५१ खासगी, बाणकोट २० सार्वजनिक व ३८७ खासगी, पूर्णगड येथे १५ सार्वजनिक, ३० खासगी, तर दाभोळ येथे ४ सार्वजनिक व २५६ खासगी अशा मिळून रत्नागिरी जिल्ह्यात ३८५ सार्वजनिक व ३ हजार १४२ खासगी मिळून ३ हजार ५२७ दहीहंड्या बांधून हा सण साजरा केला जाणार आहे.
यंदा वीस फुटाच्या वर थर लावण्यास आणि उंच मानवी मनोरे रचण्यास बंदी आहे. तरीही त्यासाठी अनेक मंडळे सज्ज झाली आहेत. महिनाभर आधीपासूनच मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथील पथक, राजापूरच्या दिवटेवाडीतील पथक, खेडचे गोविंदा पथक गेल्या काही वर्षातील चमकदार कामगिरीमुळे यंदाही चर्चेत आहेत. यंदा सर्वात मोठी हंडी कोणाची असणार, याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडीसाठी बालगोपाळांची मंडळे सज्ज झाली आहेत. यदा वीस फुटांपेक्षा उंच मानवी मनोरे रचण्यास मनाई आहे. हंडी फोडण्यासाठी चढणाऱ्या लहान मुलांवर बंदी घातली असल्याने ही मंडळे निराश झाली असल्याचे चित्र दिसत आहे.