निसर्गातील बदलामुळे यंदा पावसाळा उशिरा?, उदय बोडस यांचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:35 PM2019-06-04T13:35:26+5:302019-06-04T13:41:00+5:30
निसर्गात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पावसाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जून उजाडला तरी तीव्र उष्म्याच्या झळा सुसह्य होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरी : निसर्गात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पावसाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जून उजाडला तरी तीव्र उष्म्याच्या झळा सुसह्य होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
पावसाचे संकेत हे निसर्गार्तूनच मिळत असतात. प्रा. उदय बोडस यांनीदेखील गेली २१ वर्षे स्वत:च्या बागेत उगविणाऱ्या दोन झाडांच्या निरीक्षणातून पावसाबाबत वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. यावषीर्देखील ११ जूननंतर पाऊस पडेल, असा अंदाज बोडस यांनी वर्तविला आहे.
गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. यावर्षी तर जून महिना सुरू झाला तरी कडकडीत ऊन आहे. आभाळ भरून येत असले तरी तीव्र उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. निसर्गात उगविणाऱ्या वनस्पतींद्वारे पावसाचे संकेत प्राप्त होत असतात.
प्रा. बोडस यांची पोमेंडी येथे बाग असून, या बागेतील एका मळीत उगवणाऱ्या आधेलेफोक आणि दिंडा या दोन वनस्पतींच्या माध्यमातून त्यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी आधेलेफोकने अद्याप मान वर काढलेली नाही, तर दिंडा आत्ता उगवू लागला आहे. त्याच मळीत उगवलेल्या पावसाच्या वेलीही अर्धमेल्या झाल्या आहेत.
प्रा. बोडस यांनी बागेत ज्या ठिकाणी या दोन वनस्पती उगवतात, त्या ठिकाणापासून जवळपास २०० फूट अंतरावर एक आधेलेफोक उगवला आणि तो तीन दिवसातच वाळला. हे पर्जन्यमान कमी होण्याचा संकेत आहेत. यावर्षी ८७ टक्केच पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
महामार्गावरील वृक्षतोडीचा परिणाम देखील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता असून, कोकणातही पावसाच्या अनिश्चिततेचे ढग जमू लागले आहेत. महामार्ग कामामुळे यावर्षी वीस हजारपेक्षा जास्त झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, तर दुष्काळाचे सावट कोकणावरही येण्याची शक्यता आहे.
रोहिणी नक्षत्रावर शेतकऱ्यांनी धूळवाफेच्या पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच गायब असल्याने शेतकऱ्यांनी डोळे आकाशाकडे लावले आहेत. शिवाय पेरणी केलेले धान्य पाखरे खात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
दुबार पेरणीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पेरणी केलेल्या क्षेत्राला पाणी देणे अशक्य झाले आहे. सर्वसाधरणत: ७ जूनला मान्सून अपेक्षित असला तरी अवकाळी पाऊस मे महिन्यात बरसतो. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस झालेला नाही. त्याचबरोबर हवामान खात्यानेही मान्सून लांबण्याचा अंदाज वर्तविला आहे.
अंदाज केला तर रत्नागिरी जिल्ह्यात साधारणत: रोहिणी नक्षत्राच्या आसपास दिंडा आणि आधेलेफोक या वनस्पती उगवतात. या दोन वनस्पती उगवल्या की, त्यांच्या उंचीच्या गुणाकाराइतक्या दिवसांनी पाऊस पडतो, असा माझा ठोकताळा आहे. गतवर्षीर्चाही माझा अंदाज खरा ठरला. गतवर्षी दोन वनस्पती उगवल्यानंतर दिनांक ५ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता आणि ४ जूनलाच रात्री पावसाला सुरुवात झाली. यावर्षी मात्र या दोन्ही वनस्पती एकत्र दिसत नसल्यामुळे यंदा मान्सून ११ जूनपर्यंत लांबणार असून, ११ जूननंतरच म्हणजेच वटपौर्णिमेच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलामुळेच यंदा पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- प्रा. उदय बोडस, रत्नागिरी.