होय! मी नाराजच आहे : भास्कर जाधव

By admin | Published: October 27, 2016 10:34 PM2016-10-27T22:34:59+5:302016-10-27T23:23:59+5:30

पालिका निवडणूक : रमेश कदमांच्या हाती निवडणुकीची धुरा दिल्याने वादाला फुटले तोंड

Yes! I'm angry: Bhaskar Jadhav | होय! मी नाराजच आहे : भास्कर जाधव

होय! मी नाराजच आहे : भास्कर जाधव

Next

 
चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे, तेच नगर परिषद, नगर पंचायत तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील. पक्षनेतृत्त्वाचाही त्यांच्यावर विश्वास आहे, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले.
आमदार जाधव चिपळूणच्या निर्णयाबाबत नाराज होते. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. परंतु, त्यांच्याबरोबर चर्चा झाली असून, आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. पक्षाचे प्रभारी म्हणून पक्षाने आमदार जाधव यांच्याकडे नगर परिषदेचे एबी फॉर्म पाठविले होते. परंतु, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माजी आमदार रमेश कदम यांच्या ताब्यात फॉर्म दिले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीचे अधिकार रमेश कदम यांच्याकडे आहेत, असेही निकम यांनी स्पष्ट केले.  पक्षाकडून सतत फक्त अपमान होतो, आता हे सहन होत नाही, मी कोणावरही नाराज नाही, मी माझ्यावरच नाराज आहे. आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, जिल्ह्याचे नेतृत्व करणार नाही. कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
चिपळूण येथील महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या माटे सभागृहात गुरुवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली, यावेळी आमदार जाधव बोलत होते. गेले काही दिवस आमदार जाधव नाराज आहेत. पक्षांतर्गत निर्णयामुळे आपण नाराज आहोत, याचा पुनरुच्चार करतानाच मी माझ्या लोकांना, कार्यकर्त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण, माझ्या कार्यकर्त्यांवरील अन्याय मी आणखी किती सहन करु. मी कुठेही जाण्याचा विचार केलेला नाही, करणारही नाही. पण, माझ्या कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळत नसल्याने मी नाराज आहे, असेही ते म्हणाले.
मी कुणाचेही ताट हिसकावून घेतले नाही. विधानपरिषदेचे सदस्यपद शिवसेनेकडे होते. ते मला मिळाले. गुहागरचा आमदार भाजपचा होता, ते मला मिळाले. गेल्या बारा वर्षांत माझी एक चूक दाखवा. माझी चूक असेल तर राजकारणात राहणार नाही. सध्या जे काही सुरु आहे ते मी एन्जॉय करतोय. जिल्हाध्यक्ष शेखर निकम व प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांना विश्वासात घेऊन काम करायला गेलो. सध्या तेही नाराज आहेत. मग माझी बाजू मांडणार कोण? पक्षाचे नेतृत्व चुकले की, मी चुकलो, याचे आत्मपरीक्षण मी करीत आहे. सिंधुदुर्गमध्ये दहशतीचा सामना करुन मी तीन नगरपरिषदांमध्ये यश मिळवले. तेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणुका माझ्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव केला. परंतु, पक्षाने मला एसएमएस पाठवून तेथून बाजूला केले, असेही आमदार जाधव म्हणाले.
या बैठकीला बशीर मुर्तुझा, महंमद रखांगी, नलिनी भुवड, कुमार शेट्ये, उपसभापती नंदकिशोर शिर्के, गुहागरच्या नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, बापू जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)

रमेश कदमांकडेच चिपळूणची सूत्र
आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आज सकाळी प्रांतिकचे चिटणीस बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश दळवी यांनी आमदार जाधव यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. यावेळी पक्षाचे एबी फॉर्म प्रभारी जाधव यांच्याकडे देण्यात आले. चिपळूणचे फॉर्म त्यांनी जिल्हाध्यक्ष निकम यांच्याकडे दिले. निकम यांनी ते चिटणीस जाधव यांच्यामार्फत रमेश कदम यांच्याकडे पाठविले. त्यामुळे चिपळूणची सूत्र माजी आमदार कदम यांच्याकडेच असल्याचे सिध्द झाले.
 

Web Title: Yes! I'm angry: Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.