होय! बारमाही शेती करता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:55+5:302021-08-19T04:34:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील केळ्ये येथील दीनानाथ विजय बारगोडे यांनी कृषी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीकडे न ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील केळ्ये येथील दीनानाथ विजय बारगोडे यांनी कृषी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीकडे न वळता शेतीकडे पूर्णत: लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेती करता येते आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
पूर्वीपासूनच शेतीची आवड असल्याने दीनानाथ याने कृषी विषयातीलच अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हा ३२ वर्षांचा तरुण गेली पाच ते सहा वर्षे शेतीच्या कामात व्यस्त आहे. वडिलोपार्जित दीड हेक्टर शेतीवर लागवड तर केली आहेच; शिवाय गावातील काही पडीक जमीन कराराने घेऊन भाजीपाला, कलिंगड लागवड करून ती पिकाखाली आणली आहे.
पावसाळी भात लागवड करण्याबरोबरच आंबा, काजू, केळी, नारळ बागायती वेगळी आहे. पावसाळ्यात भात काढल्यानंतर पालेभाज्या, कोथिंबीर, कारली, वांगी, हिरवी मिरची, झेंडू तसेच कलिंगडाची लागवड ते करीत आहेत. पावसाळ्यात भातक्षेत्र वगळता अन्य मोकळ्या जागेत पडवळ, दोडकी, कारली, दुधी भोपळा, काकडी, लाल भोपळा यांची लागवड केली आहे. फळभाज्या लगडल्या असून येत्या १५ दिवसांत भाज्या विक्रीला येणार आहेत.
भात, भाज्या, कलिंगड, झेंडूसाठी योग्य नियोजन करून ते लागवड करीत आहेत. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवत असून, त्यासाठी गांडूळखत, शेणखत युनिट तयार केले आहे. भाजीपाल्याला चांगली मागणी असून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड करीत असल्याने सतत उत्पन्न घेता येते; शिवाय भाजीपाल्यात चांगला नफा मिळतो, असे दीनानाथ बारगोडे यांनी सिद्ध केले आहे.
आधुनिक शेती
भाजीपाला, झेंडू, कलिंगड विक्रीसाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ या पद्धतीवर विशेष भर आहे. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे कल अधिक आहे. कलिंगड, भेंडी पिकासाठी मल्चिंगचा वापर करीत आहेत. मल्चिंगमुळे तण येत नसल्याने खर्चात बचत होत आहे.
उत्पन्न होणार सुरू
श्रावणापासून फळभाज्यांना वाढती मागणी असते. त्यामुळे पडवळ, दोडके, कारली, दुधी, काकडी, भोपळ्याची लागवड केली असून मांडव टाकून वेली चढविण्यात आल्या आहेत. लागवडीपासून विशेष परिश्रम घेण्यात आल्याने वेलींवर फळभाज्या लगडल्या आहेत. येत्या १५ दिवसांत काढणी सुरू होणार असून, उत्पन्न सुरू होईल.
झेंडू लागवड
भाताबरोबर काही क्षेत्रावर झेंडू लागवड करण्यात आली आहे. लागवडीसाठी रोपे मात्र नर्सरीतून आणली आहेत. दसऱ्यापासून झेंडू बाजारात येण्याची शक्यता आहे. दसरा, दिवाळी, तसेच मार्गशीर्ष महिन्यात झेंडूचा खप चांगला होतो. शेतावरच ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने झेंडूला दरही चांगला मिळतो व विक्रीही सोपी होते.
.....................
सेंद्रिय शेतीला पूरक म्हणून दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे दूध व पक्षी विक्रीतून उत्पन्नासोबत विष्ठेपासून तयार होणारे खतही उपयुक्त होत आहे. त्यासाठी स्वतंत्र गांडूळखत युनिट तयार केले आहे. हे सर्व काम उभारताना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतला असून, कृषी अधिकारी गणेश जुवळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. उत्पन्न व दर्जा यांवर कटाक्षाने भर आहे.
- दीनानाथ बारगोडे, केळ्ये, रत्नागिरी