होय! आम्ही मराठीचे पाईक आहोत...!
By admin | Published: February 27, 2015 12:15 AM2015-02-27T00:15:29+5:302015-02-27T00:17:17+5:30
थोडासा दिलासा : भाषा बदलत असली तरी तरूणाई म्हणते ‘मम्मी’पेक्षा ‘आई’च बरी!
मेहरून नाकाडे - रत्नागिरी --मराठी भाषेला घरघर लागल्याची जोरदार ओरड होत असली तरीही ज्यांच्या हाती उद्याचं भविष्य आहे, ती तरूणाई मातृभाषेबाबत जागरूक असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर इंग्लिश ‘मम्मी’पेक्षा मराठी ‘आई’च बरी, असेही तरूणाईचं मत आहे. लिखाणाची भाषा बदलली असली तरीही मातृभाषेबद्दल आम्हाला जिव्हाळा आहे आणि आत्मियता असल्याचे ही तरूणाई सांगते.
मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा, ‘सोशल नेटवर्किंग साईटस्’वरील इंग्रजीचा बोलबोला यामध्ये मराठी कुठे हरवलेय? आणि ज्यांच्या हाती उद्याचं भविष्य आहे, त्या तरूणाईला याबाबत काय वाटतं? हे या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आले आणि इंग्रजीचा वापर करणारी मराठी तरूणाई मराठीबद्दल अजूनही आत्मियता बाळगणारी असल्याचेच दिसून आले.
महाविद्यालयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा आवडते का? मराठी बोलताना त्यामध्ये इंग्रजीचा वापर करणे योग्य आहे का? मराठी भाषेच्या प्रचारासाठी काय करणार? हे तरूणाईच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामधून एक सकारात्मक चित्र पुढे आले आहे.
मराठी मातृभाषा असल्याने भाषा बोलण्यास, लिहण्यास सोपी आहे, असे काही विद्यार्थ्यांना वाटत असले तरी ‘आणि’ शब्दाऐवजी अॅण्ड तोही शॉर्टकर्ट इंग्रजी लिपीतील (&) लिहिणे सोपे वाटू लागले आहे. इंग्रजीसाठी ‘शॉर्टकट’ खूप आहेत. त्यामुळेच इंग्रजी भाषा ही लिहिण्यात जास्त वापरली जाते, असे या तरूणाईचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आवडत असली, तरी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ती अवघड वाटते. बोलायला सोपी असली तरी प्रत्यक्ष लिखाणात असंख्य चुका निदर्शनास येतात. याबाबत ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात मराठी भाषा ९५ टक्के विद्यार्थ्यांना आवडत असल्याचे दिसून आले. मातृभाषा असल्याने मराठी आवडते, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे.
विद्यार्थ्यांवर संगणक व मोबाईलचा पगडा सर्वाधिक असल्याने ‘शॉर्टकट’चा वापर करून संदेश पाठवण्याकडे तरूणाईचा कल जास्त आहे. एवढेच नव्हे तर हे आता रोजच्या लिखाणातही वाढू लागले आहे. माध्यमांच्या वापरामुळे तसेच चित्रपट, मालिकांमधील इंग्रजाळलेल्या संवादांमुळे चुकीचे मराठी कानावर आदळत असल्याने त्याचा वापर होतो. माध्यमांनी दिलेली भाषेची ‘देणगी’ स्वीकारतानाही तरूणाईला मातृभाषेबद्दल आपुलकी वाटते, हेही नसे थोडके!
मराठीचा झोका उंच जावा!
भाषेचा वापर वाढवला पाहिजे हे ९६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. व्याकरणाचा अभ्यास आवश्यक असणाऱ्यांची संख्या २० टक्के , मराठीतून बोलणारे ५५ टक्के, तर वाहिन्यांवर अधिकाधिक मराठी कार्यक्रम असावेत, असे ३५ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. महाविद्यालयात मराठीचा वापर अधिकाधिक असावा असे वाटणारे २० टक्के आहेत. ई मिडियामध्ये मराठीचा वापर वाढला सांगणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे.
मोबाईल आणि संगणकीय भाषेत इंग्रजीच्या ‘शॉर्ट’ वापराचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, आता विद्यार्थी त्याचा वापर अनावधानाने परीक्षेतही करू लागले आहेत. मराठी भाषेबद्दल आपुलकी असली, तरीही तरूणाईला सवयीच्या झालेल्या ‘ई-भाषे’चा पगडा आता जास्त जाणवू लागला आहे. असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
नाविन्य हवेच !
आजची मराठी भाषा पूर्वीसारखी राहिलेली नाही. सोशल मीडियाचं, इंग्रजी भाषेचं तिच्यावर अतिक्रमण झालं आहे, हे विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे. मात्र बदल हे स्वीकारलेच पाहिजेत, त्यामुळे मातृभाषेबद्दलचा जिव्हाळा कमी होत नाही. आमची मातृभाषा मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.