काल सेनेत, आज राष्ट्रवादीत प्रवेश - धामापूर सरपंचांचा पराक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:45 PM2018-09-28T16:45:19+5:302018-09-28T16:48:14+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला.
देवरुख : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. निसटत्या मतांनी विजयी झालेल्या महिला सरपंचांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आज त्याच सरपंचांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सत्ता मिळाल्यावर मतदारांना गृहीत धरून झालेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
फेब्रुवारी २०१९मध्ये मुदत संपणाºया धामापूर तर्फे देवरुख ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी थेट सरपंच पद असल्याने चार उमेदवारांमधे चुरस होती. सरपंचपदासाठी गौरी गुरव आणि सुहासिनी भातडे यांच्यात जोरदार लढत झाली यात भातडे ११ मतांनी विजयी झाल्या.
यातील भातडे यांनी गावविकास पॅनेलच्या माध्यमातून तर गुरव यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. निकाल जाहीर होताच भातडे व सदस्य अमित जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी बुधवारी गावातून त्यांची मिरवणूक काढली.
शिवसेनेत प्रवेश करून २४ तास होतात न होतात तोच भातडे आणि जाधव यांनी गुरुवारी सावर्डे येथे शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया सेलवरुन याचे फोटो सोशल मिडियावर येताच याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षीय चिन्ह नसते त्यामुळे मतदारांना भुलवण्यासाठी गाव पॅनेल, गाव आघाडी, गाव विकास पॅनेल अशा गोंडस नावांचा वापर होतो मात्र मतदारांनी आपले काम केले की विजयी झाल्यावर मतदारांना गृहीत धरून पक्षीय प्रताप सुरु होतात.