योग म्हणजे स्वत:मधील क्षमता ओळखण्याची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:58 PM2019-06-22T12:58:49+5:302019-06-22T12:59:20+5:30
आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.
रत्नागिरी : आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.
येथील माळनाका भागातील विवेक हॉटेलच्या भागिरथी सभागृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्ममाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात रत्नागिरीतील नागरिकांनी उत्तम सहभाग दर्शविला.
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मैदान, विवेक हॉटेल हॉल, माळनाका, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पत्नी कांचन चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. बामणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, पतजंली योग समिती, राज्य कार्यकारणीच्या सदस्या रमा जोग, पंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आपण धकाधकीच्या जीवनामध्ये काम करीत असताना वेगवेगळया जीवनशैली जगत असतो. हे सर्व करीत असताना आपलं मन आणि शरीर एकत्र ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असतं. योग हा काही व्यायाम नसून तर तो स्वत: मधील क्षमता ओळखण्यांची प्रक्रिया, असे आपल्याला वाटते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यामधील क्षमता जागृत करु आणि नियमित योगा करुन आरोग्यसंपन्न राहू या, असे ते म्हणाले.
यावेळी शहरातील रा. भा. शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी योग गीत सादर केले. राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे हिनेही यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली.