व्हाॅट्सॲपचे ग्रुप ॲडमिन आहात.. सावधान; अन्यथा बसू शकतो दंडाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 12:58 PM2021-11-20T12:58:43+5:302021-11-20T12:59:32+5:30
शोभना कांबळे रत्नागिरी : व्हाॅट्सॲपची सुविधा नव्याने सुरू झाल्यानंतर एका व्यक्तीने त्यावर ग्रुप तयार करणे ही बाब नवलाईची वाटत ...
शोभना कांबळे
रत्नागिरी : व्हाॅट्सॲपची सुविधा नव्याने सुरू झाल्यानंतर एका व्यक्तीने त्यावर ग्रुप तयार करणे ही बाब नवलाईची वाटत होती. मात्र, त्यावर काही जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ टाकू लागताच त्या ग्रुपच्या ॲडमिनला डोकेदुखी होवू लागली. यातून सामाजिक, राजकीय, धार्मिक तेढ वाढण्याचे प्रकार वाढू लागताच पोलीस विभागाकडून कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र, हा बडगा केवळ अशा पाेस्ट टाकणाऱ्या नव्हे तर त्याआधी त्या ग्रुपचा जो ॲडमिन असेल त्याच्यावर उगारला जावू लागला आहे. त्यामुळे आता बहुतेक ग्रुपचे ॲडमिन खबरदारी घेऊ लागले असून ग्रुपवर केवळ ॲडमिनलाच पोस्ट टाकता येतील, अशा पद्धतीने सेंटिंग करण्यात येत आहे.
व्हाॅट्सॲपवर जे काही येईल ते तसेच पुढे ढकलायचे, ही संस्कृती व्हाॅट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर तयार होवू लागली आहे. मात्र, कुठलाही विचार न करता टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे यातून ग्रुपवर असलेल्या या व्यक्तींमुळे ॲडमिनला त्रासदायक होत असून याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा बडगा प्रथमत: ॲडमिनवर उगारला जातो.
त्यामुळे हे टाळण्यासाठी ग्रुप्ससाठी केवळ ॲडमिनच संदेश पाठवू शकेल, अशा सेटिंगची सुविधा व्हाॅट्सॲपद्वारे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अशा आक्षेपार्ह संदेशांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने ॲडमिनने काळजी घेणे गरजेचे आहे.
किती जणांवर झाली कारवाई?
- लोकांशी साध्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधता यावा या उद्देशाने व्हाॅट्सॲप तयार करण्यात आले आहे.
- संदेश मूलभूतरीत्या खासगी राहावा आणि वापरकर्ते सुरक्षित राहतील अशा पद्धतीने हे तयार करण्यात आले आहे.
- हे समाजमाध्यम अल्प कालावधीतच लोकप्रिय झाले आहे. मात्र, त्याचा गैरवापरही अनेक करतात
- आक्षेपार्ह पोस्ट, फोटो टाकल्यामुळे तेढ निर्माण होते.
- रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप अशी एकही कारवाई झालेली नाही.
ॲडमिनने काय काळजी घ्यावी?
- संपर्कांना ग्रुपमध्ये जोडण्यापूर्वी त्यांची परवानगी घेतली पाहिजे. कोणी एखाद्याला ग्रुपमध्ये जोडले आणि ते स्वतःहून ग्रुपमधून बाहेर पडले, तर त्यांच्या निर्णयाचा आदर करावा.
- व्हाॅट्सॲप ग्रुप्ससाठी 'केवळ ॲडमिनच मेसेज पाठवू शकतील' असे सेटिंग तयार केले आहे. सर्व सहभागी सदस्य ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात, की केवळ ग्रुप ॲडमिनच ग्रुपवर संदेश पाठवू शकताे, हे ठरविण्याचा निर्णय ॲडमिनवर अवलंबून असतो.
- हे सेटिंग वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे असलेले संदेश बंद होण्यास मदत होते, त्यामुळे ही खबरदारी ॲडमिनने घ्यावी.
फाॅरवर्ड करताय, काळजी घ्या !
चुकीची व बेकायदेशीर माहिती टाकणे, धमकी देणे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे संदेश, याबाबत तक्रार झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
व्हाॅट्सॲप ग्रुपवर कोणाला घ्यायचे, ही जबाबदारी ग्रुप ॲडमिनची असते. त्यामुळे ग्रुपवर सदस्यांना घेताना त्यांच्याकडून कुठलेही आक्षेपार्ह संदेश ग्रुपवर टाकली गेल्यास ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरले जाते. असे घडल्यास त्या व्यक्तीला बाजूला करणे तसेच याबाबत पोलिसांना माहिती देणे गरजेचे असते. अन्यथा त्या व्यक्तीवर कारवाई होण्याआधी ग्रुप ॲडमिनवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. - डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी