आधार अपडेटसाठी तासनतास थांबावे लागते रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:18 PM2021-02-12T13:18:07+5:302021-02-12T13:20:08+5:30
adhar Ratnagiri-काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.
सुरुवातीला जेमतेम चार लाखांपर्यंत आधार कार्डचे काम झाले होते. त्यानंतर दुसरी एजन्सी नियुक्त करून आधार कार्ड बहुतांशी लोकांना देण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यात सातत्याने नाव, पत्ता बदलणे तसेच बालकांचे नवे आधार कार्ड काढणे यासाठी आधारकेंद्रांची गरज भासते. मात्र, जिल्ह्याच्या सुमारे १८ लाख लोकांसाठी केवळ ९५ आधारकेंद्रे सध्या सुरू आहेत. बंद असलेली केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
का करावे लागते आधार नुतनीकरण
शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, विविध शासकीय लाभ, बँकांचे व्यवहार, रास्त धान्याच्या लाभासाठी आदी सर्व कारणांसाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. पाच वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे लागते तसेच आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता बदल करण्यासाठी जुने आधार कार्ड अपडेट करावे लागते.
शहरात किंवा ठरावीक ठिकाणीच आधारकेंद्रांची सुविधा उभारलेली आहे. त्यामुळे आम्हाला शहरात यावे लागते. तहसील कार्यालयात एकच आधारकेंद्र असल्याने आम्हाला आधारकार्डमध्ये बदल करावयाचा झाल्यास नाइलाजाने थांबून रहावे लागते.
- अनामिका सावंत,
गावडेआंबेरे
सरकारने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, आधारकेंद्राची संख्या कमी असल्याने बराच वेळ रांगेत रहावे लागते. लहान मुलांचेही आधारकार्ड काढावे लागत असल्याने त्यासाठी बराच वेळ लागतो. आधारकेंद्रांची संख्या वाढवायला हवी.
- संकेत हरमल, कोळंबे