आपण केवळ नेटकरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:01+5:302021-09-21T04:35:01+5:30
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करून वृत्तपत्रे समाजात जनजागृतीचे ...
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करून वृत्तपत्रे समाजात जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. मात्र, त्यातून बोध घेणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत नाही. अशी वृत्ते विविध व्हाॅट्सॲपच्या अनेक ग्रुपवर सतत फिरत असतात. हल्ली वृत्तपत्र पाहणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे, हे खर असलं तरी फेसॲप, फेसबुकवर सतत असणारेही ग्रुपवर ही वृत्ते पाहात नाहीत, की काय, असा संभ्रम मनात निर्माण होतो. कारण हीच लोक जास्त अशांच्या जाळ्यात फसतात. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे रत्नागिरीत कार्यरत असताना त्यांचे फेसबुक हॅक झाले होते. त्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांचेही फेसबुक हॅक झाले होते. त्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी
डाॅ. बी. एन. पाटील यांचे तर अलीकडेच फेसबुक हॅक होण्याचा प्रकार घडला असतानाच आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाचेच फेसबुक हॅक करून त्यावर जिल्हाधिकारी यांचा फोटो टाकून त्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जात आहे. पैशाची मागणी केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीच्या डाएट काॅलेजचे प्राचार्य डाॅ. गजानन पाटील यांच्या फेसबुकवरूनही अशीच पैशाची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अथवा अन्य लोकप्रिय किंवा ‘वेल नोन’ व्यक्तींच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून त्यावरून पैशांची मागणी केली जात आहे. अशा वेळी हे खरे आहे का, याबाबत शहानिशा करण्याचे तारतम्य तरी आवर्जून दाखवायला हवे. मात्र, बरेचदा अशा प्रकारांकडे भावनात्मकदृष्ट्या बघून भावनेच्या भरात हजारो-लाखो रूपये आपण अशा बनावट प्रोफाईलवर दिलेल्या बॅंक खात्यात जमा करतो. ‘पुढच्याला ठेच मागचा शहाणा’, अशा अनेक जुन्या म्हणी खुप काही शिकवून जातात. मात्र, आपण त्या प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना विसरतो.
सध्या आपल्या हातात एक नव्हे तर दोन दोन स्मार्ट फोन असतात. मात्र, तरीही आपण अजूनही फसवणुकीच्या बाबतीत स्मार्ट झालेले दिसत नाही. सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकार व्हाॅट्सॲप ग्रुपवर दिसतात. याबाबत पोलिसांकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. वृत्तपत्रांमधून असे फसवणुकीचे प्रकार समोर आणले जात आहेत. मात्र, तरीही दर दिवशीच नवनवीन कारणांवरून नेटकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत आपल्यात सतर्कता कधी येणार?