एमपीएससीच्या तारखा पुढे जात असल्याने तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:36 PM2020-11-28T17:36:29+5:302020-11-28T17:39:34+5:30
lanja, mpscexam, suicide, police, ratnagirinews महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेच्या तारखा वेळोवेळी पुढे ढकलल्या जात असल्याच्या नैराश्यातून कोर्ले - सहकारवाडी (ता. लांजा) येथील २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महेश लक्ष्मण झोरे असे त्या तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी १.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्याद्वारे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले.
लांजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेच्या तारखा वेळोवेळी पुढे ढकलल्या जात असल्याच्या नैराश्यातून कोर्ले - सहकारवाडी (ता. लांजा) येथील २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महेश लक्ष्मण झोरे असे त्या तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी १.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, त्याद्वारे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले.
महेश लक्ष्मण झोरे याचे सर्व कुटूंब मुंबईत राहत. मुंबईत आपला अभ्यास होणार नाही म्हणून तो जून महिन्यात गावी आला होता. महेश हा स्वतः घरामध्ये जेवण बनवून राहत होता. गावच्या घरामध्ये कोणीच नसल्याने तो मन लावून अभ्यास करू लागला. महेशचे मामा दत्ताराम हाकू कोलापटे त्याची देखभाल करत होते.
महेशचा परीक्षेचा अभ्यास जवळपास पूर्ण झाला होता. त्यामुळे तो परीक्षेच्या तारखांची वाट पाहता होता. मात्र, सातत्याने परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्यातूनच त्याने गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमाराला घराच्या पडवीच्या वाशाला साडीचा गळफास लावून आपले जीवन संपविले.
सकाळपासून भाचा कुठे बाहेर दिसला नाही म्हणून मामा दत्ताराम यांनी त्याच्या घरी जावून पाहिले. त्यावेळी त्याचा मृतदेह दिसला. याबाबत त्यांनी लांजा पोलीस स्थानकात माहिती दिली. लांजा पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, दिनेश आखाडे, चालक अमोल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली.
अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे
विश्वास नांगरेपाटील हे महेशचे आदर्श होते. त्यांच्यासारखा अधिकारी बनण्याचा ठाम निश्चय त्याने केला होता. याआधीही त्याने एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र, तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती. पण खचून न जाता पुन्हा परीक्षा देऊन यश संपादन करण्याचा निश्चय केला होता.