Ratnagiri: गडनदी पात्रात तरुण बुडून बेपत्ता, शोध सुरु
By अरुण आडिवरेकर | Published: December 3, 2024 05:29 PM2024-12-03T17:29:10+5:302024-12-03T17:29:37+5:30
देवरुख : नदीपात्रात गेलेला प्लास्टिकचा टब काढण्यासाठी गेलेला तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल, साेमवारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली - ...
देवरुख : नदीपात्रात गेलेला प्लास्टिकचा टब काढण्यासाठी गेलेला तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल, साेमवारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली - गुरववाडी येथील गडनदी पात्रात घडली. प्रशांत प्रभाकर भागवत (वय २१, रा. रांबाडे चाळ, खेरशेत, ता. चिपळूण) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, अद्यापही त्याचा शाेध लागलेला नाही.
प्रशांत भागवत याची काकी प्रतीक्षा प्रदीप यादव या साेमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान गडनदी पात्रात कपडे धुवण्यासाठी गेल्या हाेत्या. त्यांच्यासाेबत प्रशांतही आंघाेळीसाठी गेला हाेता. दरम्यान, कपडे ठेवण्यासाठी नेलेला प्लास्टिकचा टब नदीपात्रातील पाण्यातून वाहून गेला. ताे पकडण्यासाठी प्रशांत याने नदीपात्राच्या पाण्यात उडी मारली. मात्र, त्यानंतर ताे पुन्हा बाहेर आलाच नाही.
ही घटना घडल्यापासून नदीपात्रात बेपत्ता झालेल्या प्रशांत याचा शोध घेण्यात आला. परंतु, नदीपात्रातील पाण्याची पातळी जास्त व डोह तसेच खडक असल्याने शाेधकार्यात अडचण निर्माण हाेत आहे. माखजन तसेच संगमेश्वर पोलिस, आरवली गावचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ व प्रशांत याचे नातेवाईक त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
या घटनेची माहिती प्रशांत याचे वडील प्रभाकर बाळकृष्ण भागवत यांनी माखजन पोलिस स्थानकात दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी तपास करीत आहेत.