कोकणातील तरुण, तरुणी बेरोजगार राहणार नाहीत, उद्योगमंत्री उदय सामंतांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:20 PM2022-08-17T18:20:17+5:302022-08-17T18:20:39+5:30
कोकणाचा विकास कसा होईल, यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार
रत्नागिरी : भविष्यात कोकणातील सुशिक्षित तरुण किंवा तरुणी बेरोजगार राहणार नाहीत, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आपल्याला उद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे कोकणाचा विकास कसा होईल, यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे 'क' वर्ग पर्यटनस्थळ विकास कामांतर्गत मारुती मंदिर चौक येथे सुशोभिकरणातून शिवसृष्टी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती शिल्प उभारण्यात आले आहे. शिवसृष्टी आणि स्मृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा रविवारी रात्री उशिरा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
खातेवाटप झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन झालेल्या सामंत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परशुराम घाटाची पाहणी करून वाटेत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारत रत्नागिरीत दाखल होण्यास त्यांना उशीर झाला तरीही कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी मागविलेला शंभर फुटी हार मात्र त्यांनी स्वीकारला नाही. इतका मोठा हार स्वीकारण्यासाठी आपण पात्र नाही. त्यापेक्षा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आपण तो हार माजी सैनिकांना घालू, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. माजी सैनिकांनी जे संरक्षण जनतेला दिले त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. त्यामुळे भला मोठा पुष्पहार घालून आपण त्यांचा सत्कार करू, असे त्यांनी विनम्रपणे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस लवकरच रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.