तरुण पिढीने पुढे यावे : इंदुलकर
By admin | Published: February 13, 2015 09:10 PM2015-02-13T21:10:15+5:302015-02-13T22:59:56+5:30
शिरगावची बैठक: प्रबोधक बैठकीला तालुक्यातून प्रतिसाद
चिपळूण : सध्याच्या वेगवान युगात स्वत:मधील शक्तीस्थाने बळकट करण्याची संधी आजच्या तरुण पिढीला उपलब्ध झाली आहे. या संधीचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करावा, असे आवाहन श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर यांनी केले.
चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे विकास सहयोग प्रतिष्ठानतर्फे युवकांसाठी प्रबोधक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. आजची मुले ही खरोखरच भाग्यवान आहेत. पूर्वीपेक्षा विविध सुविधा आता उपलब्ध आहेत. त्यामुळे, आयुष्याची वाटचाल करीत असताना आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हेदेखील अत्यंत जागरुक आणि डोळसपणे पहावे लागणार आहे. समाज, जाती, धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवरच आहे. तरूणांचे जागरूक मन समाजाला आज एका निर्धाराने पुढे नेऊ शकते. त्यामुळे आपले आयुष्य जगताना चौफेर व दिशादर्शक वाटचाल आपणास करावी लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या जागृत समाजाच्या निर्मितीची पाऊले आताच पडू द्या, असे आवाहन इंदूलकर यांनी केले.
ललेश कदम म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या नावाने चालणारे राजकारण धोकादायक वळण घेऊ शकते आणि याचा पहिला बळी तुमच्यासारखे युवक-युवती ठरणार आहेत. त्यामुळे, आपली जागरूकता व संवेदनशीलता देशाचे भवितव्य घडवू शकते.
सगळीकडे सामाजिक न्यायाच्या गप्पा मारल्या जात असताना, खरोखरच दिनदुबळ्या अशा समाजाला हा न्याय मिळतो का? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आहे. कारकूनी नोकरी करण्यावर अवलंबून राहिलो तर या देशात मोठी उपासमार होऊ शकते. म्हणून शेती, पर्यावरण, सहकार, प्रामाणिकपणा, लिंगभेद आदींच्या संरक्षणासाठी आजच्या युवा पिढीला कटीबद्ध व्हावे लागेल, असे आवाहन विकास सहयोगचे विभागीय समन्वयक विजय कदम यांनी केले. कदम यांनी या शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या बैठकीस पोफळी, कुंभार्ली, पेढे, रेहेळे, अनारी येथील युवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)