Lok Sabha Election 2019 तरूण मतदार ठरविणार नवा खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:58 PM2019-04-10T22:58:31+5:302019-04-10T22:58:56+5:30

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची ...

The young voter will decide the young voters | Lok Sabha Election 2019 तरूण मतदार ठरविणार नवा खासदार

Lok Sabha Election 2019 तरूण मतदार ठरविणार नवा खासदार

Next

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या सुमारे पाच लाखाच्या आसपास असल्याने या तरूणांच्या मतदानात खासदार कोण, हे ठरविण्याचे सामर्थ्य आहे.
मागील काही वर्षात निवडणुकीची टक्केवारी घसरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मतदारांची नाव नोंदणीसाठी असलेली उदासीनता तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी असलेली अनुपस्थिती, यामुळे मतदानाची टक्केवारी असमाधानकारक अशी आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविला. यात मतदार यादीतील नावे वगळणे, दुरूस्ती तसेच नव्याने नाव समाविष्ट करणे, या तीन मुद्द्यांवर आधारित हा कार्यक्रम होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांशी संपर्क करून त्यांना त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले. त्यामुळे विविध वयोगटातील मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येनुसार दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या १३ लाख ९५ हजार ५३८ इतकी आहे. यात १८ ते १९ या वयोगटातील मतदार २६,७७४ इतके आहेत, तर २० ते २९ या वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख २० हजार ९०३ इतकी आहे. १८ ते ३९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ९९ हजार ४०९ इतकी आहे. म्हणजेच या वयोगटातील मतदार एकूण संख्येच्या ३६ टक्के आहेत. त्यामुळे या मतदारांच्या मतांवर कोण खासदार निवडून येणार, हे ठरणार आहे.
त्याचबरोबर ४० ते ५९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ८९ हजार इतकी आहे. त्यामुळे मतदारांची मतेही कोण खासदार होणार, हे ठरण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. ६० ते ६९ वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख ५२ हजार ३३७, ७० ते ७९ या वयोगटातील मतदारांची संख्या ९८,८२३, तर ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ५५,९६८ इतकी आहे.
या सर्वच वयोगटातील महिला मतदारांचा विचार करता १८ ते १९ वयोगटात महिला मतदार कमी असल्या तरी त्यापुढील सर्वच वयोगटात महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासदार निवडीत महिला मतदारांचा वाटाही खूप मोठा असेल, हे निश्चित आहे.
उमेदवारांची : भीस्त तरूण मतदारांवर
प्रचार यंत्रणांमध्ये तरूणवर्ग उत्साहाने काम करीत असतो. त्यामुळे उमेदवारांचेही विशेष लक्ष तरूण मतदारांवरच असते. यावेळीही सर्वच उमेदवारांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियाचा वापर करणारी पिढी सर्वाधिक याच वयोगटातील असल्याने उमेदवारांनीही चाळिशीच्या आतील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत.

महिला मतदारांचीही मते ठरणार निर्णायक...
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या एकूण १४ लाख ४० हजार ९६६ मतदारांपैकी महिला मतदार ७ लाख ३५ हजार ९९७ इतके, तर पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ५ हजार ३५० इतकी आहे. साहजिकच महिलाची मते खासदार निवडीसाठी निर्णायक ठरणार आहेत.
ज्येष्ठही ठरणार श्रेष्ठ
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील ७० वर्षापुढील मतदारांची संख्या १,५४,७९१ इतकी आहे. त्यामुळे अनेक पावसाळे पाहिलेल्या या मतदारांवरही उमेदवारांची भिस्त असणार आहे. मात्र, तरीही प्रचारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या वयोगटातील ज्येष्ठांना मतदानासाठी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Web Title: The young voter will decide the young voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.