रत्नागिरीतील मालगुंड येथे धरणात बुडून युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:07 PM2024-08-09T12:07:30+5:302024-08-09T12:07:47+5:30
गणपतीपुळे : धरणात पोहायला गेलेल्या युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथे गुरुवारी ...
गणपतीपुळे : धरणात पोहायला गेलेल्या युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. पार्थ राजेंद्र राणे (१७, रा. दत्तमंदिर मागे, मालगुंड, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
पार्थ हा रत्नागिरीतील फाटक महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत हाेता. गुरूवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला होता. पार्थ व त्याचे मित्र धरणाच्या पाण्यात पोहत असताना पार्थ याला अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात आले. त्याला चक्कर आल्याने तो बुडू लागला. मित्रांच्या ही गाेष्ट लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला ताबडतोब मित्रांनी व आजूबाजूला असलेल्या इतर तरूणांनी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
त्याला बेशुद्धावस्थेत आणल्यानंतर त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पंचनामा जयगड पोलिस स्थानकाच्यावतीने मालगुंड गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, जयेश कीर व अन्य सहकाऱ्यांनी केला. याप्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.
पार्थ हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा होता. ताे अत्यंत गुणी आणि हुशार असा मुलगा हाेता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण मालगुंड गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात त्याचे आई-वडील, एक भाऊ व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.