रत्नागिरीतील तरुणांनी साकारले वाळूशिल्प
By admin | Published: September 9, 2014 11:31 PM2014-09-09T23:31:13+5:302014-09-09T23:47:25+5:30
अनोखा उपक्रम : विविध नेत्यांचे वाळूचे अर्धपुतळे
उमेश पाटणकर - रत्नागिरी -रत्नागिरीच्या मांडवी किनारी शहरातील आठ तरुणांनी एकत्र येऊन साकारलेले वालूका शिल्प पाहण्यास गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून भारतभूमीच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या विविध नेत्यांचे वाळूचे अर्धपुतळे गणरायांच्या स्वागतासाठी सज्ज होते.
मांडवी येथे राहणाऱ्या तरूणांना काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास नेहमीच लागलेला असतो. गणपती-नवरात्री या कालावधीत शाडूच्या मूर्ती घडवणे, हा यातील काहींचा छंदच. त्यांना आणखी काहींची अशी जोड मिळाली की, त्यातून रत्नागिरीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. राजेश शिवलकर, अमित पेडणेकर, सुधीर जोशी, अभिषेक शिवलकर, अनिष शिवलकर, अमोल शिवलकर, परेश शिवलकर आणि प्रतीश शिवलकर अशी या तरूणांची नावे आहेत.
सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरु असताना हे सर्व मित्र एकत्र आले, अन वाळूशिल्प तयार करण्याचे ठरवले. राष्ट्रपुरुषांचे अर्धपुतळे वाळूत साकारण्याचे ठरले. समुद्रकिनारी शिल्प साकारताना वाऱ्याचा त्रास होणार होता. सोबत पावसाचा माराही होताच. तरीही डगमगून न जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तयार झाला. अन मागोमाग लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, शहीद भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह दानशूर भागोजीशेठ कीर आदींचे अर्धपुतळे साकारले गेले.
वाळूशिल्प सर्वांना पाहता यावे, यासाठी मांडवी धक्क्याच्या दिशेने दर्शनी भागात साकारण्यात आले होते. वाळू शिल्पाला वाऱ्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्याने सर्व गणेशभक्तांना वाळूशिल्प डोळ्यात साठवता आले.