वाशिष्ठी पुलाखाली अडकलेल्या तरुणाला एनडीआरएफ'ने वाचवले, अद्याप ओळख पटली नाही
By संदीप बांद्रे | Published: July 20, 2023 03:20 PM2023-07-20T15:20:33+5:302023-07-20T15:22:08+5:30
बघ्यांची पुलावर मोठी गर्दी
चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला पुर आला होता. नदीचे पाणी वेगाने वाहत होते. अशातच नदीतून वाहत आलेला एक तरूण वाशिष्ठी पुलाच्या पिलरला लटकलेला होता. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. लाईफ जॅकेट आणि रोपवेच्या साहाय्याने एनडीआऱएफचे जवान त्या तरूणाजवळ पोहोचले. १६ जवानांच्या टिमने त्या तरूणास पुरातून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला आहे.
चिपळूणात बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सातत्याने पावसाचा जोर राहिल्याने येथील वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाशिष्ठीने धोका पातळी ओलांडल्याने प्रशासनाने सतर्कतचे इशारा दिला होता. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास वाशिष्ठी नदीच्या पुलाखाली एका पिलवर तरूण अकडला असल्याची माहिती एनडीआरएफला देण्यात आली. त्याचवेळी एनडीआरएफची टीम शहरात कार्यरत होती.
एनडीआरएफच्या पथकाचे निरीक्षक अशोक कुमार व त्यांच्या १६ जवानांची टीम तत्काळ आवश्यक साहित्यासह वाशिष्ठी पुलावर पोहोचली. यावेळी नदीची पाणी पातळी वाढतच होती. तसेच पाण्याला गतीही जास्त होती. एनडीआऱएफचे जवानांनी लाईफ जॅकेट, बोये तसेच रोपांच्या साहाय्याने त्या पिलरजवळ पोहोचले. त्यावेळी हा तरूण खूप घाबरलेल्या अवस्थेत होता. तेथे जवान येताच त्याला थोडा दिलासा मिळाला.
जवानांनी त्या तरूणास सुखरूपणे बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. हे जवान वेळीत तेथे पोहोचल्याने तरूणाचा जीव वाचल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात पुलावर गर्दी केली होती. चिपळूण पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते. बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर शहर व परिसरातील लोकांना दिलासा मिळाला होता.
'तो' तरुण बोलतच नाही
एनडीआरएफच्या पथकाने वाशिष्ठीच्या पुलाखाली अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानंतरही तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तात्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता तो शुद्धीवर आला आहे. परंतु तो काहीच बोलत नाही. त्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.अशिद नरवणे यांनी दिली.