जाकादेवी आठवडा बाजारात पिण्याच्या पाण्याची मागणी
By Admin | Published: December 15, 2014 08:59 PM2014-12-15T20:59:05+5:302014-12-16T00:17:36+5:30
व्यापाऱ्यांचा मुद्दा : स्वच्छतागृहासाठीही धरला आग्रह
जाकादेवी : जाकादेवी येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली आहे.
खालगाव - जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे खालगाव रोडजवळील तळ्याकाठी कातळावर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. सकाळी ८ ते सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत आठवडा बाजार सुरु असतो. जाकादेवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बाजाराचा लाभ घेतात. भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी येथे ठिकठिकाणाहून व्यापारी येत असतात. येथील व्यापारीही या बाजारात उत्साहाने भाग घेतात.
कातळावर भरत असलेल्या या बाजारासाठी छत्र्या घेऊन किंवा काही सावली डोक्यावर घेऊन हे व्यापारी बसलेले असतात. अलिकडे उन्हाचा कडाका असतोच त्यामध्ये वातावरणात दमटपणा असतो. अशा उन्हाळी वातावरणात तहानही लागते. अलिकडे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स बरोबर घेतल्या जातात. तरीही दुपारच्या जेवणाचा डबा खाताना पाणी अधिक प्रमाणात लागते. तिथे बॉटल्स अपुऱ्या पडतात व पाण्याची गरज वाढते म्हणून बाजाराच्या ठिकाणी हजार लीटर पाण्याची टाकी बाजाराचे दिवशी ठेवली तर पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल . हा बाजार कातळावर अगदी उघड्यावर भरत असल्याने पाण्यावाचून ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. जवळपास झाडे - झुडपेही नसल्याने सावलीही मिळत नाही. या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होते. मात्र येथे स्वच्छतागृहाचा अभाव आहे. येथे महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बाजाराचे दिवशी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तेथे आठवडा बाजारातील स्वच्छतागृहाची मागणी गेले काही दिवस होत असून खालगाव - जाकादेवी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली जात आहे. आठवडा बाजार जेथे भरला जातो त्या ठिकाणी रस्त्यासमोर पाण्याचा छोटा तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्यात कपडे धुतले जातात . ते तळे स्वच्छ केलेले नाही त्यामुळे ते पिण्यास नाही. तेथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, असे व्यापाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, तळ्याचा विकास व पाण्याची सुविधा हे दोन मुद्दे येथे महत्त्वाचे आहेत. (वार्ताहर)