जिल्हा परिषद कोरोनाचा ‘हाॅटस्पाॅट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:27+5:302021-06-06T04:23:27+5:30
रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद सध्या कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव आणि त्यापाठोपाठ ...
रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद सध्या कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव आणि त्यापाठोपाठ मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड याही कोरोनाबाधित झाल्याने सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही लोकप्रतिनिधींचा जाहीर कार्यक्रम करण्याचा सोस कशासाठी, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अभ्यागतांसाठीच नव्हे तर सगळेच विभाग सील करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
१५ मार्चनंतर शिमगोत्सव झाल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली. त्यामुळे १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील विविध भागातून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची दिवसभर वर्दळ असते. काेरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्हा परिषदेचे सर्व विभाग अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक विभागात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांनीच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, तरीही मध्यंतरीच्या काळात पुन्हा अभ्यागत येण्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित विभागातील कर्मचारी १५ टक्के क्षमतेपर्यंत उपस्थित राहतील, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही काही विभागप्रमुखांनी आडमुठेपणा दाखवत आपल्या विभागात १०० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याची सक्ती केली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले. सध्या पहिल्या फळीत असलेल्या आरोग्य विभागातीलही अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव हे पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली. आरोग्य विभागाने सर्व पदाधिकाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याबाबत कोणीही फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यानंतर दोन दिवसातच मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड याही कोरोनाबाधित झाल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पुढे सरकत असताना ती थोपविण्यासाठी डाॅ. जाखड यांनी ग्रामीण भागात जात जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या लसीकरणाची धुराही सांभाळली आहे. त्यामुळे या कालावधीत पहिल्या फळीत राहिल्याने त्या कोरोनाबाधित झाल्या आहेत.
सध्या जिल्हा परिषद कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनले असल्याने कोरोना रोखण्यासाठी काही दिवसांकरिता या संपूर्ण इमारतीतील कामकाज बंद करावे. त्याचबरोबर उद्घाटनासारखे सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाची लाट सरेपर्यंत रद्द करावेत, अशा प्रतिक्रिया नागरिक त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.