खड्डेमय रस्त्यांबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ

By admin | Published: May 26, 2016 09:57 PM2016-05-26T21:57:10+5:302016-05-27T00:23:37+5:30

अहवालाची प्रतीक्षा : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण

Zilla Parishad ignorant about pothole roads | खड्डेमय रस्त्यांबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ

खड्डेमय रस्त्यांबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ

Next

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात रस्त्यांवरून वाहतूक करणे मुश्किल होणार आहे. बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, पावसाळ्यापूर्वी त्यावर उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाळा तोंडावर आला तरी किती रस्ते खड्डेमय आहेत, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात शहरी भागातील रस्ते चकाचक दिसत असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती त्याउलट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामीण भाग डोंगराळ व दुर्गम आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाईट स्थितीत आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे रस्ते व साकव उखडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळणवळण फारच त्रासदायक ठरत आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग येतात. केवळ महामार्गांकडे शासनाने लक्ष दिले. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. मागील वर्षी पावसाळ्यानंतर जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी केली असता त्यांनी ६७८७ किलोमीटरच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे समोर आणले होते. त्यामध्ये चिपळूण विभागात ३३८६ किलोमीटर आणि रत्नागिरी विभागात ३४०१ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होऊनही त्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेने रस्ते विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत या रस्त्यांसाठी शासनाकडे १९४ कोटी ९३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला शासनाकडून रस्ता दुरुस्तीसाठी आला होता. त्यामुळे काही प्रमाणात रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली होती.
जिल्ह्यात ६५०० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यांची आणखी एक-दोन वर्षे दुरुस्ती न झाल्यास या रस्त्यांवरून चालणे मुश्किल होऊन ग्रामीण जनतेचे हाल होणार आहेत. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, ही दुरुस्ती तर सोडाच पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील किती रस्ते नादुरुस्त आहेत, याची माहितीही जिल्हा परिषदेच्या दोन्ही बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही. नादुरुस्त रस्त्यांची माहिती दोन्ही बांधकाम विभागांनी नऊही तालुक्यांकडे मागवली होती. मात्र, अद्याप तालुक्यांनी ती दिलेली नसल्याने जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झालेली नाही. (शहर वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad ignorant about pothole roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.