जिल्हा परिषद राबविणार ‘माझे गाव कोरोनामुक्त’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:03+5:302021-06-17T04:22:03+5:30
रत्नागिरी : दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी व तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ...
रत्नागिरी : दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी व तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्राम कृती दलाच्या साहाय्याने स्पर्धात्मक सहभाग घेऊन उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिली आहे.
या मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. २८ जूनपर्यंत त्यासाठी गावे कोरोनामुक्त करण्याची डेडलाइन सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. त्यावेळी सर्व तालुक्यांना एक ऑनलाइन तक्ता देण्यात येणार आहे. त्यातील आकडेवारीनुसार सर्व स्तरावरील मूल्यांकन करण्यात येणार आहे. या मोहिमेला स्पर्धात्मक स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे पुरस्कार प्राप्त तालुका, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांनाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे, असे डॉ. जाखड यांनी सांगितले.
ग्रामपातळीवर कोविड सेंटरसाठी दानशूर, व्यापारी तसेच लोकसहभाग घ्यावा, ग्रामपंचायतींना स्व:निधीचा उपलब्धतेनुसार उपयोग करावा. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या २५ टक्के मर्यादेत ३० बेडचा विलगीकरण कक्ष या बाबींचा आराखडा तयार करावा. तालुकास्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेने जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करावा व कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या १३ दिवसात माझे गाव कोरोनामुक्त हे उद्दिष्ट ठेवून चांगले काम करण्याचे आवाहन डॉ. जाखड यांनी केले आहे.