जिल्हा परिषद : जानेवारींपर्यंत बांधकाम करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:32 PM2019-01-22T14:32:25+5:302019-01-22T14:33:40+5:30
पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.
रत्नागिरी : पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजाणी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे. आपला जिल्हा सांघिक प्रयत्नातून व सहकार्यातून डिसेंबर २०१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला होता. शासनाच्या नवीन सुधारित निकषानुसार घर तेथे शौचालय या संकल्पनेस प्राधान्य देण्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०१२ ला वैयक्तिक शौचालये पायाभूत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांचा नव्याने समावेश झालेला आहे. त्यांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे.
यापैकी ८९६ कुटुंबियांनी शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, उर्वरित कुटुंबियांनी ही शौचालये जानेवारी, २०१९ पर्यंत बांधणे अवश्यक असून तशी सूचना मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर सचिव यांच्या आदेशानुसार विशेषत: या कुटुंबांनी दोन शोषखड्डयाचे शौचालय बांधणे अनिवार्य आहे.
सेप्टीक टँक आणि एक शोषखड्डा शौचालयाच्या तुलनेत दोन खड्डयाचे शौचालय अधिक फायदेशीर आहे.
दरम्यान, एकीकडे निर्मल जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना अजूनही ग्रामीण भागात शौचालयांबाबत पुरेशी जागृती झाली नसल्याने अनेकांनी अनुदान असतानाही शौचालय बांधण्याच्या कामाबाबत टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे.