जिल्हा परिषदेवर आता प्रभारींचे ‘राज’
By admin | Published: September 11, 2016 11:05 PM2016-09-11T23:05:45+5:302016-09-11T23:19:00+5:30
अनेकांच्या बदल्या : रिक्त पदांचा चढता आलेख...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाली असून, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा आलेख हा वाढताच आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व चिपळूण बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या रिक्त पदांवर प्रभारीच कामकाज पाहत आहेत.
प्रशासनातील या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अन्य विभागाचा चार्ज देऊन कामाचा बोजा वाढविण्याची पध्दत आता जुनी राहिलेली नाही. जिल्हा परिषदेत रिक्त होणाऱ्या पदावर शासनाकडून नवीन नियुक्ती कधी होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे एकदा का एखादे पद रिक्त झाले की, सहा महिने, वर्ष, दीड वर्ष भरले जात नाही. त्यामुळे हे पदही अद्याप रिक्तच आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे यांची पुणे येथे बदली झाली असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी साळोखे यांची बदली रायगड जिल्हा परिषदेमध्ये महिनाभरापूर्वीच झाली आहे. मात्र, त्यांना दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले तर डॉ. पुसावळे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. तसेच दोन महिन्यांपूर्वी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू झाल्याशिवाय त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्येही कार्यकारी अभियंता पदावर वर्षभरापेक्षा जास्तकाळ उपअभियंता एस. बी. जंगम हे प्रभारी म्हणून कामकाज पाहात आहेत. बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता वन्नोरे याच कालावधीत रजेवर गेले. वन्नोरे हे गेल्याच आठवड्यात सेवानिवृत्त झाल्याने चिपळूण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतापदही रिक्त झाले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता, चिपळूण बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासन कधी भरणार, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)