सर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 06:46 PM2021-02-19T18:46:45+5:302021-02-19T18:47:45+5:30
Ratnagiri ZpNews- रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.
रत्नागिरी : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर राजीनामे देणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच जिल्हा नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना यावेळीही अध्यक्ष, सभापतिपदापासून दूर राहावे लागणार आहे.
पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या मुदतीप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांना राजीनामे देण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. मात्र, या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ३९, राष्ट्रवादीचे १५ आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.
दरम्यान, त्यामध्ये शिवसेनेच्या १६ सदस्य जिल्हा नियोजन समिती आहेत. त्यामुळे उर्वरित २३ जणांना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदे मिळणार हे निश्चित होते. त्यापैकी महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे आणि समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव या जिल्हा नियोजन समितीवर आहेत. नियोजन समितीचे सदस्य पद राष्ट्रवादीकडे जाऊ नये, यासाठी ऋतुजा जाधव यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती.
दरम्यान, चंद्रकांत मणचेकर, पर्शुराम कदम, पूजा नामे, स्वप्नाली पाटणे, रेश्मा झगडे, मानसी साळवी आणि मंदा शिवलकर हे नियोजन समितीचे सदस्य नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेतील पदे मिळणार हे निश्चित आहे. मात्र, शिवसेनेमध्ये मानसी साळवी आणि मंदा शिवलकर यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना सभापतिपदापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कौन बनेगा अध्यक्ष
अध्यक्षपदासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू व बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विक्रांत जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विक्रांत जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी ते अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांना संधी मिळू शकते. मात्र काही जणांचा त्याला विरोध आहे.