रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष करणार दाैरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:56+5:302021-07-07T04:38:56+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्हा परिषेदतर्फे राबविण्यात येणाऱ्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव १२ ते २० जुलै ...
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्हा परिषेदतर्फे राबविण्यात येणाऱ्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव १२ ते २० जुलै या कालावधीत जिल्हा दौरा करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर आरोग्य यंत्रणेची तयारी, झिरो पेंडन्सी, जलजीवन मिशन आणि मनरेगाचा आराखडा यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
गेली दीड वर्षे कोरोनामुळे सर्वच विकासकामे थांबलेली आहेत. अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, थांबलेल्या कामांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पावले उचलली जात आहे. त्यानुसार १२ जुलैला रत्नागिरी पंचायत समितीमधून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांत आढावा बैठक होणार आहे. या दौऱ्यामध्ये सर्व खात्यांचे प्रमुखही सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रलंबित कामांची कारणे लक्षात घेऊन ऑन दि स्पॉट निर्णय घेतले जाणार आहेत. दाैऱ्यात ग्रामविकास विभागाच्या झिरो पेंडन्सी आणि नियमित कामांचा निपटारा याचा आढावा घेतला जाईल. तसेच मनरेगाच्या आराखड्यांचे प्रेझेंटेशन, जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या अंदाजपत्रकाची स्थिती, कोरोनातील दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि तिसऱ्या लाटेची सज्जता याचा आढावाही ते घेणार आहेत. पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहिलेले विषयांचाही निपटारा ते करणार आहेत.