तिसऱ्यांदा उदय बने होणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:22+5:302021-04-05T04:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वात जास्तवेळा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या उदय बनेंच्या गळ्यात शिवसेनेकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वात जास्तवेळा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या उदय बनेंच्या गळ्यात शिवसेनेकडून तिसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची माळ सोमवारी पडणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. बने हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना शिवसेनेकडून उपाध्यक्ष पदासह बांधकाम व आरोग्य या समित्यांची सभापतीपदे देण्यात येणार आहेत. उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपदही असते. मात्र, बनेंची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेकडून त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीपदाचा पदभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बने हे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या गटातून सलग पाचवेळा निवडून आले आहेत. या २४ वर्षांच्या कालावधीत त्यांनी उपाध्यक्ष पदासह शिक्षण व वित्त समिती, बांधकाम व आरोग्य समिती, पशुसंवर्धन समिती या समित्यांच्या सभापतीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समिती या समित्यांच्या माध्यमातूनही त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी यापूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने सोमवारी होणारी बने यांची निवड ही औपचारिकताच राहणार आहे.
चौकट
एका दिवसाचे उपाध्यक्ष
शिवसैनिक ते तालुकाध्यक्ष अशी यशस्वी भूमिका पार पाडणारे उदय बने हे एका दिवसाचे औट घटकेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनले होते. त्यांनी पक्षादेश मानून एका दिवसात जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी ते दोनवेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते. त्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांची उपाध्यक्षपदी निवड होणार आहे तसेच दुसऱ्यांदा बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद ते भूषविणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच तीनवेळा उपाध्यक्षपदी निवड होणारे उदय बने हे एकमेव सदस्य ठरणार आहेत.