जिल्हा परिषदेला मिळणार २६ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:28+5:302021-05-21T04:33:28+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४६ पैकी २६ रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ४६ पैकी २६ रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित २० रुग्णवाहिकांची मागणीही करणार आहे, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६७ पैकी ४६ रुग्णवाहिका जुन्या झाल्या आहेत. पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्याचवेळी जास्तीत जास्त रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला मिळाव्यात, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी ९ रुग्णवाहिकांना मंजुरी दिली असून, त्या येत्या आठवडाभरात जिल्ह्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर शासनाकडून ७ रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे एकूण १६ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम परत गेली असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी लक्षात आणून दिली. त्या रकमेतून जिल्ह्याला १५ रुग्णवाहिका मिळाव्यात या मागणीचा प्रस्ताव वित्त आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी वडील आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला आणखी १० रुग्णवाहिका मिळणार आहेत. अशा एकूण २६ रुग्णवाहिका जिल्ह्याला येणार असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूर हे उपस्थित होते.
--------------------
रामपूर पीएचसीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणार
जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. कारण दर्जोन्नती करून स्टाफ, नर्स तसेच अधिक सोयी-सुविधा मिळणार असतील तर त्याचा रुग्णांना जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळणार असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर लवकरच गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचीही दर्जोन्नती मिळणार आहे, अशी माहिती अध्यक्ष जाधव यांनी दिली.