जिल्हा परिषदेला ७० कोटी निधी मिळणार, अध्यक्ष विक्रांत जाधव यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:13+5:302021-07-11T04:22:13+5:30
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेला ७० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी ...
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेला ७० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबतही सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेची विकासकामे तसेच विविध प्रश्नांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री पवार आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारीही उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर तत्काळ भरती करण्यासाठी सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत घेतली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एकूण पदांपैकी १० टक्के पदे परिचर प्रवर्गातून लवकरच भरण्यात येणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता ही महत्त्वाची पदेही लवकरच भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्त पदांची माहिती सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिली. रिक्त पदांबाबत वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
फळबाग लागवडीसाठी असलेल्या विम्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री पवार आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी मान्य केली आहे. मात्र, त्यासाठी विम्याचा हप्ता वाढणार आहे. या बैठकीतील चर्चेनुसार लवकरच शेतकरी, बागायतदारांची बैठक घेणार असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, आदी उपस्थित होते.