रत्नागिरीत प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून प्रारंभ होणार, ७५ कोटींचे अंदाजपत्रक
By शोभना कांबळे | Published: November 17, 2023 03:35 PM2023-11-17T15:35:01+5:302023-11-17T15:38:33+5:30
पालकमंत्री सामंत यांनी दिले निर्देश
रत्नागिरी : शहरानजिकच्या आरेवारे येथे होणाऱ्या प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. ७५ कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आले आहेत.
मंत्री उदय सामंत यांनी या प्राणी संग्रहालय उभारणीसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्राणी संग्रहालयाच्या सामंजस्य कराराबाबत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्राणी संग्रहालयाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख आणि वाॅल कंपाऊंडसाठी ५ कोटी रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार असून प्राणी संग्रहाच्या वॉल कंपाउंड चे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी या बैठकीत दिले.
या कामासाठी सिंधू रत्न योजनेमधून दहा कोटी रूपये देण्यात येणार असून एक डिसेंबरपर्यत कामाला सुरवात करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहे. प्राणी संग्रालय हा रत्नागिरीमधील महत्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्याची मानसिकता अधिकारी वर्गाने ठेवून जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण पुजार, उप मुख्य कार्यकरी अधिकारी परिक्षित यादव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भरत चौघुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.