शिवसेना विभागप्रमुखाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:44 PM2019-04-07T23:44:11+5:302019-04-07T23:44:17+5:30
आरवली : सुमो आणि ट्रक अपघातात संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे कडवई विभागप्रमुख जयवंत पांडुरंग बने ...
आरवली : सुमो आणि ट्रक अपघातात संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे कडवई विभागप्रमुख जयवंत पांडुरंग बने (वय ५५) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
जयवंत बने संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून शनिवारी रात्री सुमोने (एमएच-१२ बीव्ही १९८०) घरी परतत होते. तुरळ बसथांब्यानजीक समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच-०४ एफजे ४१८७) सुमोला जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तेथून डेरवण हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
घटना समजताच आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू सुर्वे, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन बने, माजी सभापती दिलीप सावंत, उपसभापती छोट्या गवाणकर, सभापती सोनाली निकम, भाजप सरचिटणीस अमित ताठरे, राजेंद्र्र महाडिक, कडवई सरपंच वसंत उजगावकर, राजन कापडी, उपतालुका प्रमुख कृष्णा हरेकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तुकाराम येडगे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच असंख्य शिवसैनिकांनी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनानंतर कडवई, तुरळ, चिखली आणि परिसरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
निष्ठावंत कार्यकर्ता
मूळ शिंदे आंबेरी गावचे असणारे बने हे कडवई ग्रुप ग्रामपंचायतमध्ये शिंदे आंबेरी गावचे नेतृत्व करत होते. ते काही काळ कडवई गावचे सरपंच होते, तर पाच वर्षे उपसरपंच पदावर कार्यरत होते. ते कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सदस्यही होते. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते ही त्यांची ओळख. सुरुवातीच्या काळात साधा कार्यकर्ता, नंतर शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख अशा पदांवर काम केल्यानंतर ते गेली दहा वर्षे कडवई विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, आई व भाऊ असा परिवार आहे.