corona virus रत्नागिरीत रुग्णांची संख्या वाढती -सामाजिक न्याय भवन येथे नवीन रूग्णालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:07 PM2020-06-01T14:07:55+5:302020-06-01T14:24:23+5:30
रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने रुग्णालयाचे काम तत्काळ करण्यात आले.
रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे रुग्णालय कुवारबांव परिसरात सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे.
जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय केल्याने रुग्णालयातील इतर सर्व विभाग बाहेर खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचाराबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्तीदेखील रुग्णालयात ठेवण्यात येत होत्या. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने रुग्णालयाचे काम तत्काळ करण्यात आले.
तातडीने रुग्णालयाचे काम पूर्ण होताच, शनिवारी सायंकाळी काही कोरोनाबाधित रुग्णांची रवानगी या नव्या रुग्णालयात करण्यात आली. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रुग्णांना या नवीन कोविड रूग्णालयात दाखल केले जाणार आहे.
या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून, चार स्टाफ नर्स या रुग्णालयात नियुक्त केल्या आहेत. तसेच अन्य स्टाफदेखील तत्काळ दिला आहे. त्यामुळे याठिकाणीही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.