लग्न टिकवण्यासाठी १० टिप्स; तुमचं नातं १०० टक्के पक्कं करतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:56 PM2020-01-03T18:56:15+5:302020-01-03T18:59:43+5:30
मिलेनिअल पिढीतील जोडप्यांकडे लग्न टिकवण्यासाठीचे प्रयत्न करायला वेळ आणि संयमच नाही.
>> लीना परांजपे
लोकांची सहनशीलता कमी कमी होत चाललेल्या काळात आपण जगत आहोत. त्यात भर म्हणजे, एखादी गोष्ट यशस्वी व्हावी, यासाठी त्या गोष्टीकडे लक्षपूर्वक किंवा ध्यानपूर्वक पाहण्यासाठी जो वेळ द्यायला हवा, तोसुद्धा आता कुणाकडे नाही. नातेसंबंध आणि विशेषत: वैवाहिक जीवनसुद्धा याला अपवाद नाही.
मिलेनिअल पिढीतील जोडप्यांकडे लग्न टिकवण्यासाठीचे प्रयत्न करायला वेळ आणि संयमच नाही. त्यामुळे विभक्त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा सोपा मार्ग स्वीकारताना ते दिसतात. हे खरंय की, काही नाती टिकवणं खूपच कठीण असतं, पण तरीही बहुसंख्य लग्नं टिकवता येऊ शकतात, अशी आशा ठेवायला निश्चितच जागा आहे.
तुमच्या वैवाहिक जीवनात खूपच अडचणी किंवा समस्या येत असतील आणि तुमचं लग्न आता ‘आर या पार’च्या स्थितीत आहे, असं वाटत असेल, तर तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींवर एकदा विचार करायला हवा-
१. कृतज्ञता व्यक्त करा
तुमच्या नात्यासाठी, तुम्ही एकत्र घालवलेल्या आयुष्याविषयी तुम्ही एकमेकांना कधीही कृतज्ञता व्यक्त करत नसाल तर कोणतंही नातं टिकणं अशक्य आहे. एकमेकांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिका.
२. एकमेकांचं कौतुक करा
फक्त महिलांनाच त्यांचं कौतुक व्हावं असं वाटतं, असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कोणतंही लग्न यशस्वी व्हायचं असेल तर नवरा-बायकोने एकमेकांचं कौतुक करायलाच हवं. अगदी लहान लहान बाबींच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांचं कौतुक करू शकता. एकमेकांशी गोड बोलत रहा, म्हणजे नाराजीला कोणतंही कारणच उरणार नाही.
३. मर्यादा आखून घ्या
तुम्ही प्रेमात आहात, याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वर्तनातील अत्यंत गंभीर चुका पोटात घालाव्यात असा अजिबात होत नाही. एकमेकांमधील दोष तसंच चुका समजून घेणं हे एका मर्यादेपर्यंतच बरोबर ठरतं. पण जोडीदाराची प्रत्येक गोष्ट स्वीकारणं तुम्हाला अत्यंत महाग ठरू शकतं. एकमेकांसाठीच्या मर्यादा घालून घ्या आणि जोडीदार कुठे चुकत असेल तर त्याच्याशी त्याविषयी स्पष्ट बोला.
४. बाह्य हस्तक्षेप थांबवा
तुमचं लग्न तसंच जोडीदारासोबतचं तुमचं नातं ही एक अत्यंत खासगी बाब आहे. तुमच्या नात्यात काही तणाव असेल आणि त्याबाबत तुम्ही तुमची मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून सल्ले घेत असाल तर काही प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. एखादा नातेवाईक तुमच्या वैवाहिक जीवनात जास्तच हस्तक्षेप करू लागला तर त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील गैरसमज अधिकच वाढू शकतात. त्यामुळे बाह्य हस्तक्षेपासाठी एक मर्यादा घालून घ्या.
५. भूतकाळातल्या चुका खोदून काढणे टाळा
जोडीदाराने भूतकाळात केलेल्या चुकांचा उल्लेख वर्तमानातील भांडणात करणे हा मानवी स्वभावच आहे. अशा चुका आपल्यापैकी प्रत्येकजण करत असला तरी ज्या मुद्द्यावरुन वाद आहेत, त्या मुद्द्यावरच बोलणं श्रेयस्कर ठरतं. जोडीदाराने भूतकाळात केलेल्या चुका खोदून काढून त्यावरून त्याला भांडणाच्या वेळी दोष देणं अत्यंत चुकीचं ठरू शकतं. भूतकाळात जे झालं ते झालं, त्याचा आता बाऊ करण्यात काही अर्थ नाही, हे पक्कं ध्यानात असून द्या.
६. मन दुसऱ्या गोष्टीकडे वळवा
तुमचं लहानसं भांडण कितीही वाढू शकतं. जोडीदारासोबतचा तुमचा वाद कोणत्याही निष्कर्षाला पोहोचत नसेल, त्यातून काहीच निघत नसेल आणि तुम्ही त्यात अधिकाधिक गुरफटत जात असाल तर एक क्षण थांबा, स्वत:ला शांत करा. शक्य असल्यास तुमचं मन दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे वळवा. एखादा वादाचा विषय तुम्हाला जितका महत्त्वाचा वाटतो तितका तो महत्त्वाचा असतोच असं नाही.
७. माफी मागा
“मी पहिली माफी का मागायची” असा प्रश्न जर प्रत्येकाला पडू लागला तर लग्न म्हणजे अहंकाराची लढाईच ठरेल. एखादा वाद संपवण्यासाठी माफी मागणं किंवा सॉरी म्हणणं खूपच मानवी आहे. एखाद्या वेळी तुमची चूक नसेल तरीही भांडणातून माघार घेणं योग्य ठरू शकतं. तुम्ही दोघे आयुष्यासाठीचे जोडीदार आहात. त्यामुळे लहानसहान वादांमुळे तुमच्या प्रदीर्घ काळच्या नात्यावर परिणाम होऊ न देणे, नेहमीच श्रेयस्कर.
८. विनोदबुद्धी जागृत करा
परिस्थिती कितीही गंभीर असो, विनोदामुळे ती हलकी होऊ शकते. जेव्हा एखादा वाद सुटतच नसतो तेव्हा कधी कधी एक साधा विनोद त्याला चुटकीसरशी सोडवू शकतो. तुमच्यातील विनोदबुद्धी जागृत करा आणि नाराजीचे विषय कसे क्षणार्धात सुटतात ते बघा.
९. स्पर्शाची ताकद
असह्य मानसिक वेदना एका प्रेमळ स्पर्शामुळे सुसह्य होऊ शकते. शारीरिक आपुलकी जर आपल्या आयुष्याचा भागच आहे, तर स्पर्शाच्या या ताकदीचा उपयोग जोडीदारांनी करायला काय हरकत आहे. एक साधी मिठी, चुंबन किंवा प्रेमळ स्पर्शामुळे तुमच्या शरीरातील आक्सिटोसिन किंवा लव्ह हार्मोन्स सोडले जातात, त्यामुळे आपोआपच नात्यात जोडल्याची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. जाणीवपूर्वक हे करून पाहा आणि बदल अनुभवा.
१०. सोडून देऊ नका
कोणतंही नातं तोडून टाकणं हे सोपं वाटतं, पण ते टिकवण्यासाठी स्वत: पूर्ण करणं कधीही श्रेयस्कर ठरतं. नातं टिकवण्यासाठीचे प्रयत्न लगेच सोडून देऊ नका. तुमच्या जोडीदाराने जरी नातं तोडलं तरी तुम्ही त्या नात्याची जबाबदारी स्वीकारून त्या नात्यात विश्वास भरण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रभावी संवाद साधणं ही कोणतंही नातं टिकवण्याची गुरुकिल्ली आहे, हे कायम लक्षात असू द्या.
(लीना परांजपे या सर्टिफाइड मॅरेज कोच आहेत.)