एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 01:55 PM2018-09-06T13:55:27+5:302018-09-06T15:04:17+5:30

गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात.

1000 days very crucial for the development of body and brain of child | एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

googlenewsNext

गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात. आपले बाळ हुशार असावं, त्याच्यात आत्मविश्वास असावा, सर्व गोष्टी अगदी सहजरित्या आत्मसात कराव्यात, त्यानं सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे पाहावे, यासाठी प्रत्येक आईवडील धडपड करत असतात. त्याचे संगोपन योग्यरित्या व्हावं, यासाठी पालक अहोरात्र प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाचे योग्य त्या दिशेनं पोषण न झाल्यास त्याच्या मेंदूचा विकासात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. असे झाल्यास याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही.  गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरच्या 1000 दिवसांतील संगोपन त्याच्या मेंदू आणि शरीराची निरोगी वाढ होण्यास आणि प्रतिकारकशक्ती वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शारीरिक व मानसिक विकासादरम्यान संसर्ग, आजारपण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्यास बाळाच्या शरीर व मेूंदची वाढ योग्यरित्या होत नाही. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता नसणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये मागे पडणे, उत्साह नसणे अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.

स्तनपान का आहे आवश्यक?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं आरोग्य हे त्याच्या जन्मानंतरच्या 1000 दिवसांमध्ये करण्यात आलेल्या संगोपनावर अवलंबून असते. या कालावधीत मिळाणारे पोषण हे लठ्ठपणा, कुपोषित, आजार आणि अन्य बाबींशीदेखील संबंधित असते. नवजात बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी त्याच्या जन्मानंतर एक तासाच्या आत आईचे दूध पाजणं आवश्यक असते. दोन वर्षापर्यंत बाळाला स्तनपान करावे. आईचे दूध प्यायल्याने बाळाचे संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण होते. स्तनपानामुळे बाळाला आवश्यक ती पोषकतत्त्वदेखील मिळतात. शिवाय, पचनक्रियादेखील सुधारण्यास मदत होते. आईचे दूध प्यायल्यानं मुलाचा मानसिक व शारीरिक विकास होतो व आजारांची लागण होण्याचाही धोका कमी होतो.

बाळाचा आहार कसा असावा?

6 महिन्यांपासून ते 18 वर्षांपर्यंत पोषणासंबंधीच्या गरज पूर्णतः बदलतात. आईच्या दूधाव्यतिरिक्त त्याला पौष्टिक आणि सकस आहार मिळणंही आवश्यक आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक आवश्यकतेनुसार त्यांना व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत प्रोटिन्स, लोह, कार्बोहायड्रेट्सचा आहारातून पुरवठा करावा.  बाळ एक वर्षांचं झालं त्याला की त्याला/तिला कुटुंबीयांसहीत जेवण करण्याची सवय लावावी. यावेळी त्याच्या आहारात सुका मेवा, कच्च्या भाज्या, दही इत्यादी प्रमाणे पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. मात्र त्याचा आहार स्वतःहून न ठरवता डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. आहारात सुका मेव्याचे प्रमाण तसे कमीच ठेवावे कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅलरीज् असतात. मटार, डाळी, अंडी हे प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. याव्यतिरिक्त फळे खाण्याचीही सवय बाळाला लावावी. जसे-जसे वय वाढत जाईल, तसे-तसे बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ घालाव्यात. 

आईवडिलांनीही सवयींमध्ये बदल करावा

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मेंदूची योग्य वाढ होण्यासाठी मुलांच्या आहारात लोह असणं गरजेचं आहे. हाडे आणि स्नायूं मजबूत  असावेत, यासाठी कॅल्शिअमचा पुरवठा होणेदेखील गरजेचं आहे. दरम्यान, अतिशय गोड, तिखट, खारट पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे या गोष्टी वर्ज्य कराव्यात. असे म्हणतात लहान मुल मोठ्या माणसांना पाहून शिकत असतं. या पार्श्वभूमीवर आपल्या बाळाचे संगोपन, पोषण योग्यरित्या होण्यासाठी आपणदेखील सवयींमुळे बदल करणं गरजेचं आहे. 

Web Title: 1000 days very crucial for the development of body and brain of child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.