एक पेपर नॅपकिन, ३०,००० फुटांवरची मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 09:13 AM2024-06-12T09:13:20+5:302024-06-12T09:14:20+5:30
या गोष्टीला तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. ते दोघे विमानात बसून प्रवास करत होते. तिची सीट त्याच्या मागे होती. तो मोबाइलवर काहीतरी बघत आपल्याच नादात मग्न होता. बाकीचे प्रवाशीही प्रवासाने झोपाळलेले होते. आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय करतंय याचं त्याला भान नव्हतं.
या गोष्टीला तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. ते दोघे विमानात बसून प्रवास करत होते. तिची सीट त्याच्या मागे होती. तो मोबाइलवर काहीतरी बघत आपल्याच नादात मग्न होता. बाकीचे प्रवाशीही प्रवासाने झोपाळलेले होते. आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय करतंय याचं त्याला भान नव्हतं. त्याचं लक्ष त्याच्या मोबाइल स्क्रीनवर खिळलेलं होतं. ती त्याच्या मागच्या सीटवर बसलेली. मधल्या फटीतून आपल्या मोबाइल स्क्रीनमध्ये पूर्ण गुंगून गेलेला तो तिला दिसत होता.
बराच वेळ त्याला न्याहाळल्यावर ती आपल्या भावना रोखू शकली नाही. चहा-कॉफी द्यायला आलेल्या एअर होस्टेसकडून तिने एक पेपर नॅपकिन मागून घेतला, त्यावर लिहिलं, ‘यू आर टू क्यूट !’ - आणि हा कागद त्याला द्यावा की नाही याचा काहीही विचार न करता सीटच्या मधल्या फटीतून तो कागद तिने त्याच्याकडे सरकवला. पुढे काय झालं असेल? अचानक हाती आलेला तो पेपर नॅपकिन बघून तो आधी काहीसा गडबडला, मग त्यावरचा मेसेज वाचून खुश झाला आणि हसून त्याने त्याच पेपर नॅपकिनवर लिहिलं, ‘जस्ट लाइक यू’ - आपल्या सीटच्या मागच्या फटीतून तोच पेपर नॅपकिन त्याने तिला दिला.
एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही घटना इंडिगोच्या विमानात घडली दहा वर्षांपूर्वी... त्या ओळखीतून त्या दोघांची सविस्तर ओळख झाली आणि पुढे मग मैत्री! आपल्याला असा एक मित्र मिळाला त्याला दहा वर्ष झाल्याच्या आनंदात तिने ही घटना इंस्टाग्रामवर लिहिली आणि ती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. या गोड आठवणींचा, मैत्रीच्या प्रवासाचा, मैत्रीखातर नंतर दोघांनी एकत्र घालवलेल्या वेळाचे फोटो असलेला एक सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला. जगभरातून त्याला प्रतिसाद मिळाला. तुम्ही हा मजकूर वाचत असाल, तोवर दोन कोटी नव्वद लाखांहून अधिक लोकांनी ती पोस्ट वाचली, पाहिली आहे आणि त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मैत्री तर कुठेही होऊ शकते, ती टिकवली, वाढवली तर जगात त्यासारखी सुंदर गोष्ट नाही, हे सिद्ध करणारी ही घटना लोकांच्या मनाला स्पर्शून जाते आहे.
ही गोष्ट आहे सिद्धी चोखानी आणि शुभम पिल्ले यांच्या मैत्रीची. आपल्या पुढच्या सीटवर बसलेल्या तरुणाशी न घाबरता मैत्री करणे, आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करणे या तिच्या सहज सुंदर कृतीचे जगभरात कौतुक होते आहे. त्यांच्या फ्लाइटमधील अनपेक्षित भेटीचा, नंतर बहरलेल्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सिद्धीच्या एका छोट्या कृतीने एक दशक टिकून राहिलेल्या या मैत्रीला सुरुवात झाली होती. शुभम बरोबरच्या आपल्या मैत्रीची कहाणी सांगणारा सिद्धीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी त्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या.
काही लोकांनी इतक्या अनिश्चित आयुष्यात अगदी अचानक अशी मैत्री मिळणे हाच एक चमत्कार असल्याचे म्हटले आहे. इतकी वर्षे झाली, तरी या कहाणीतले दोघे अजून रोमँटिकरीत्या एकत्र न आल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या दोघांच्या सुरुवातीच्या क्यूट-क्यूटनंतर अचानक एकदम ‘फ्रेंडझोन’ कसा काय तयार झाला यावर अनेकांनी कमेंट केली आहे. त्यांच्या नात्याचे स्वरूप काहीही असो, सिद्धी आणि शुभमची कथा अनपेक्षित मैत्रीचे सौंदर्य दर्शवते यावर मात्र सगळ्यांचे एकमत आहे. शुभम आणि सिद्धीच्या दशकभराच्या मैत्रीची कहाणी वाचून काहींना आपल्या मित्रमैत्रिणींची आठवण आली. काही नात्यांची सुरुवात अशी अनपेक्षितपणे होते, कल्पनाही करू शकणार नाही अशा ठिकाणी, क्षणी होते अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. मैत्री कशी झाली, कुठे झाली, कधी झाली हे तर महत्त्वाचे आहेच, पण ती कशी निभावली, तिचा प्रवास कसा होता, आहे हेदेखील महत्त्वाचे ठरते, असेही काहींनी लिहिले आहे. शुभम आणि सिद्धीला मैत्री मिळाली, तसा चमत्कार आपल्याही आयुष्यात व्हावा असे तर अनेकांना वाटते आहे.
एकाने तर ‘असे गटस माझ्यात नाहीत बाबा’ असे थेट कबूलही करून टाकले आहे. एकीने तर ‘मी एवढी विमानातून प्रवास करते, मला का नाही असा क्यूट मुलगा का नाही भेटत?’ असा थेट सवालच केला.
हे भारीच झाले की!शुभम आणि सिद्धी भेटले इंडिगोच्या विमानात
सिद्धीने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, “३०,००० फुटांवर योगायोगाने झालेल्या भेटीमुळे आभाळाच्या उंचीची मैत्री होऊ शकते हे कोणाला माहीत होते ? जीवनाचा प्रवास इतका अविस्मरणीय बनवणाऱ्या अनपेक्षित घटनेचा, भावनांचा आनंद वाटतो. शुभम आणि सिद्धीच्या या मैत्रीला अनेकानेक शुभेच्छा!” - इंडिगोची ही पोस्टही काही लाख लोकांनी 'लाईक' केली आहे.