आपण आहात मुलांचे ‘रोल मॉडेल’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:26 PM2017-09-12T15:26:48+5:302017-09-12T15:26:48+5:30

बघा, बरं जरा स्वत:ला तपासून..

Are You Children's 'Role Model'? | आपण आहात मुलांचे ‘रोल मॉडेल’?

आपण आहात मुलांचे ‘रोल मॉडेल’?

Next
ठळक मुद्देआपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार मुलांवर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो.मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात.वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात.

- मयूर पठाडे

मुलांच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी दोन गोष्टी दिसतात. एकतर त्यांचे अति लाड, अति कौतुक नाहीतर मग प्रत्येक गोष्टीत त्यांना घालून पाडून बोलायचं. तुला अक्कलच नाही, एवढीशी गोष्ट सांगितली तरी कळत नाही.. तुला किती वेळा सांगायचं?.. अशी वाक्यं पालकांच्या तोंडून कायम निघत असतात. पण अशी वाक्यं मुलांसाठी खूपच घातक असतात, हे पालकांच्या लक्षातच येत नाही. काहींना वाटतं, रागावल्याशिवाय त्यांना कळतच नाही. त्याशिवाय ते वठणीवर येतच नाहीत.. पण मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील, त्यांनी तुमचं ऐकावं, चांगल्याच गोष्टी कराव्यात, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना रागवण्यापेक्षा आणखीही काही गोष्टी आहेतच की.
बघा, त्यांचा वापर करून. मुलांना चांगल्या सवयी नक्की लागतील. गेल्या भागात आपण त्याविषयी बोललो होतो, आता या आणखी काही गोष्टी.. आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठीही..

मुलांना चांगल्या सवयी कशा लागतात?
१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं ही ‘आपली’च असतात. ती आपलंच अनुकरण करीत असतात. आपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार त्यांच्यावर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो. हे रोल मॉडेल चांगलंच असलं पाहिजे याची काळजी आपण घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण घरात जसे वागतो, त्याचंच अनुकरण मूल करीत असतं. त्यासाठी अगोदर आपली वागणूक आदर्श अशीच असली पाहिजे.
२- मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात. साध्या साध्या गोष्टी.. थॅँक्यू, वेलकम, सॉरी.. हे किती साधे शब्द.. पण आपण ते घरात किती वेळा वापरतो? आपलं चुकलं तर किती वेळा ते आपण मान्य करतो, प्रत्येक लहान सहान गोष्टीत किती वेळा आपण दुसºयाचे आभार मानतो? आपण जर या गोष्टी करीत असलो, तर मुलंही आपोआपच या गोष्टी शिकतात.
३- वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात. मुलांना अगदी वाचता येत नसलं तरी त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवणं, त्याचा अर्थ सांगतानाच, त्यांना गंमतही वाटेल अशा पुस्तकांची निवड करणं, पुस्तकं कायम मुलांच्या अवतीभोवती असतील असं वातावरण निर्माण करणं, आपण स्वत:ही त्यात रमणं.. या गोष्टी मुलांवर उत्तम संस्कार करतात. अनेक गोष्टी आज इंटरनेट, टीव्हीवर उपलब्ध असल्या, तरी त्यासोबत वाचनाची गोडीही मुलांना लावणं महत्त्वाचं आहे.
४- आपलं मूल प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे जे आपल्याला मिळालं नाही, ती ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाला मिळाली पाहिजे असंही अनेक पालकांना वाटत असतं, त्यात वाईट काही नाही, पण ‘नकाराचा’ अर्थही मुलांना समजला पाहिजे. कोणती गोष्ट आपल्याला मिळेल आणि कितीही हट्ट धरला तरी एखादी गोष्ट मिळणार नाही म्हणजे नाही, हेही मुलांना कळलं पाहिजे. पण त्या ‘नाही’मध्येही तारतम्य असलं पाहिजे.
अशा या काही साध्या, सोप्या गोष्टी, त्या आपण स्वत: करतानाच मुलांमध्येही त्याची आवड निर्माण करता येते. चांगल्या सवयी अशा आपोआप अंगी बानवल्या जातात. त्या कुठे विकत मिळत नाहीत आणि त्यासाठी शोधाशोधही करावी लागत नाही. त्या आपल्याच आसपास विखुरलेल्या असतात..

Web Title: Are You Children's 'Role Model'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.