Relationship: त्यानेच मागणी घातलेली, लग्नाच्या दिवशी तोच पळून गेला; नववधूने एकटीनेच सर्व विधी केले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:29 PM2022-09-27T20:29:47+5:302022-09-27T20:30:37+5:30
नवऱ्याची ४ वाजेपर्यंत वाट पाहिली. तो येईल असे तिला वाटत होते. त्याला अनेकदा फोन केला, पण समोरून काहीच उत्तर आले नाही. त्याने असा धोका का दिला, काहीच कळत नव्हते.
लग्नाच्या दिवशी वर किवा वधू पळून गेल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. मंडपात उरलेल्या एकाने त्याच्याच नात्यातल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्याचे देखील अनेक किस्से आहेत. परंतू, वर पळून गेला तरी लग्नाचे सर्व सोपस्कार पूर्ण करणाऱ्या वधूबाबत कधी ऐकले नसेल.
लग्नाच्या दिवशीच होणारा पती पळून गेला, हे ऐकून नववधूला धक्का बसला. परंतू, तिने मन घट्ट करून कठोर निर्णय घेतला. लग्नाचे सर्व कार्यक्रम तिने एकटीनेच पूर्ण केले. तिच्या या निर्णयाबद्दल उपस्थित पाहुण्या-मित्रमंडळाने देखील कौतूक केले. तिने सर्व फोटो देखील नवऱ्याशिवायच काढले. धक्कादायक बाब म्हणजे याच तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली होती आणि तोच पळून गेला होता.
ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणारी काईली स्टीडचे लग्न १५ सप्टेंबरला होणार होते. तिने लग्नाच्या आयोजनासाठी जवळपास १० लाख रुपये खर्च केले होते. लग्नाच्या दिवशी तिला तिचा होणारा नवरा पळून गेल्याचे समजले. तिचे हृदय तुटले होते. हॉलमध्ये पै पाहुणे जमायला सुरुवात झाली होती. ती त्यांना काय सांगणार? तिने न बोलताच सर्वांना सारे काही सांगण्याचा प्रयत्न केला. लग्नाचे सर्व सोपस्कार, ठरलेला कार्यक्रम, फोटोग्राफी तिने एकटीनेच पार पाडली.
नवऱ्याची ४ वाजेपर्यंत वाट पाहिली. तो येईल असे तिला वाटत होते. त्याला अनेकदा फोन केला, पण समोरून काहीच उत्तर आले नाही. तो लग्नापासून का पळाला याची मला काहीच कल्पना येत नव्हती. त्रास होत होता, त्याने असा धोका का दिला, काहीच कळत नव्हते. त्यानेच तर लग्नासाठी प्रपोज केलेला. मग अचानक असे काय झाले की त्याने काहीही न सांगता लग्नाला न येण्याचा निर्णय घेतला, असे काईली म्हणाली.
२०१८ मध्ये त्यांच्यात नातेसंबंध तयार झाले होते, त्याने २०२० मध्ये लग्नाची मागणी घातली होती. लग्नापूर्वी काईली आणि तिचे मित्रमंडळ बॅचलर पार्टी करत होते, त्याच्या बाजुलाच तो देखील त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता. लग्नाच्या आदल्या दिवशी एकमेकांशी बोलायचे नाही, असे त्यांनी ठरविले होते. यामुळे काहीच बोलणे झाले नाही, दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राने तो गेल्याचे सांगितल्याचे काईलीने म्हटले आहे.