सावधान: मुलांसमोर भांडताय? मग मुलांना गमावून बसाल!
By admin | Published: May 10, 2017 06:07 PM2017-05-10T18:07:15+5:302017-05-10T18:07:15+5:30
मुलांसमोर कचाकचा भांडणाऱ्या पालकांच्या मुलांच्या मनावर होतात गंभीर दुष्परिणाम
-डॉ. अनिल मोकाशी
आई वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. मुलांना असुरिक्षत वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडिलांच्या भांडणात मुलं काळजीने घेरली जातात. घाबरतात. भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्यामुळेच भांडणं होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधानकाळ (कॉन्संट्रेशन) कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उद्धटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्र मकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानिसक समस्या येऊ लागतात.
मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी, त्यात कौटुंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडताना स्वत:वर मर्यादा घालून घ्यायला हव्यात. त्या पाळायला हव्या.
भांडण होतेय असे वाटले तर काय करावे?
शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा. राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी. मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे. माफी मागायला व माफ करायला शिकावे. सहसंमतीने मधूनच पाणी, चहा इतर गोष्टींसाठी भांडण विश्रांती घ्यावी. ब्रेक घ्यावा.
भांडताना काय करू नये?
मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको. शिविगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उद्धार नको. निघून जाऊ नये. त्याने प्रश्न सुटत नाही. किंचाळून, खेकसून बोलणे नको. जाहीर भांडण नको. मुलांना भांडणात ओढायला नको. फक्त वयस्कांचे, लैंगिक, पैसे, सासुरवाडी असे विषय मुलांसमोर नको. जुन्या चुका, जुने मुद्दे उकरून उकरून भांङण नको.
भांडण होतेच पण..
थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचा एक भाग असतो. अगदी बंद दाराआड, कुजबुजत भाडांयची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलूंन वाट मोकळी करु न देणं आवश्यक असते. कुटुंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्यात. रागाच्या भरात बोललेले सगळेच खरे नसते हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात. हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडिलांना भांडताना बघितल्यावर जुळवून घेतानांही बघायला हवे. त्यातून ते जीवनात तडजोड किती आवश्यक आहे, जूळवून कसे घ्यावे हे शिकतील.
पण भांडणं वारंवार व जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होऊ लागली, तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधाऱ्या व्यक्तीचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटुंबाचं हित आहे. भांडणाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेले व्यसन, जुगार, पावित्र्याबद्द्ल शंका असे प्रश्न समुपदेनातुन उघड होतात. त्यांचे निवारण करता येते.
म्हणून म्हणतो, आईबाबांनो,
भांडा, पण जरा जपून, तुमची मुले बघताहेत, ऐकताहेत, तेच शिकताहेत.
( लेखक बारामतीस्थित सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत.)
dranilmokashi@gmail.com