तुमची मुलं घरी एकटी राहतात का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 11:16 AM2018-11-08T11:16:02+5:302018-11-08T11:16:48+5:30
सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे अनेकदा घराकडे मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यात अनेक मुलांचे आई आणि वडील दोघेही वर्किंग असतात.
(Image Creadit : galla.seelenfluegel.info)
सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे अनेकदा घराकडे मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यात अनेक मुलांचे आई आणि वडील दोघेही वर्किंग असतात. त्यामध्ये जर न्युक्लिअर फॅमिली (संयुक्त कुटुंब) असेल तर अनेकदा ही मुलं घरामध्ये एकटीच असतात. अशावेळी मुल शाळेतून घरी आल्यावर स्वतःचं घराचं लॉक उघडण्यापासून ते जेवण गरम करून घेईपर्यंत सर्व कामं करतात. मुलं घरात एकटी असल्यामुळे तुम्हालाही त्यांची सतत काळजी वाटत राहते. अशातच तुम्ही काही आवश्यक गोष्टींवर लक्ष दिलं तर तुमची काळजीही कमी होईल आणि मुलांनाही घरामध्ये एकट्याने मॅनेज करणं सोपं होऊन जाईल.
घरी पोहोचल्यावर मुलांना कॉल करायला सांगा
मुलांना सक्त ताकीद देऊन ठेवा की, ज्यावेळी ते घरी पोहोचतील तुमच्यापैकी कोणा एकाला त्यांनी कॉल किंवा मेसेज केलाच पाहिजे. घरी पोहोचल्यानंचतर सर्वात आधी ते सुखरूप घरी पोहोचल्याचे पालकांना कळवणं गरजेचं असतं. मुलांनी नाही केला तर पालकांनीच कामातून थोडा वेळ काढून मुलांच्या घरी पोहोचण्याच्या वेळी फोन करून मुलं घरी पोहोचल्याची खात्री करून घ्यावी.
एक लिस्ट तयार करा
ज्या पालकांची मुलं घरी एकटी राहतात त्यांनी मुलांना एकट्याने मॅनेज करणं सोपं व्हावं यासाठी एक लिस्ट तयार करून ठेवावी. या लिस्टमध्ये मुलांना जी कामं करायची आहेत त्यांची लिस्ट करा. त्याचसोबत त्यामध्ये 5 अशा व्यक्तींचे फोन नंबर्स लिहून ठेवा ज्या व्यक्ती मुलांना गरज पडल्यास लगेच तिथे पोहोचल्या पाहिजेत. यामध्ये शेजारी, नातेवाईक, शाळेतील मित्र किंवा इतर लोकांचे कोणाचेही नंबर्स तुम्ही विचारपूर्वक देऊ शकता. त्या लिस्टमध्ये तुमच्या विभागातील पोलीस स्टेशनमधील नंबरही लिहून ठेवावा.
मुलांना घरचा रस्ता नीट समजावून सांगा
तुमच्या मुलांना घरचा पत्ता नीट समजावून सांगा जेणेकरून ते रस्ता चुकले तर त्यांना एखाद्या व्यक्तीला समजावून सांगता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीलाही त्यांना घरापर्यंत आणून सोडणं सोपं होईल.
घरातील होम अप्लायसेन्सचा वापर करणं शिकवा
मुलांना घरातील वस्तू आणि उपकरणांचा व्यवस्थित वापर करणं शिकवा. त्या वस्तूंचा व्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने वापर करणं सोप जाईल. अनेकदा घरी एकटं असताना मायक्रोवेवमध्ये जेवणं गरम करणं, गिझर सुरू करणं, इस्त्री करणं यांसारख्या गोष्टी करण्याची गरज भासते. त्यामुळे त्यांना प्रत्येक उपकरण हॅन्डल करता येणं आवश्यक असतं.
वेळेचे भान ठेवा
घरामध्ये एकटं राहणाऱ्या मुलांना ज्या गोष्टीची वचन द्याल त्या गोष्टी वेळेवर पूर्ण करा. खासकरून तुम्ही त्यांना घरी पोहोचण्याची जी वेळ सांगाल त्या वेळेतच घरीच पोहोचा. जर घरी पोहोचण्यास उशीर होणार असेल तर त्यांना आधीच त्या गोष्टीची कल्पना द्या. त्यांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका.