coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO च्या महत्त्वाच्या सूचना, दूर होतील अनेक समस्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:30 PM2020-03-28T13:30:48+5:302020-03-28T13:38:34+5:30
वर्क फ्रॉम होम करत असलेल्या लोकांना घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात WHO ने काही टिप्स दिल्या आहेत ज्याने तुमच्या समस्या कमी होतील.
कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे एकीकडे लोक घरांमध्ये बंद आहे. तर दुसरीकडे लोकांकडे त्यांच्या परिवारासाठी आणि मुलांसाठी वेळ देता येत आहे. शाळा बंद असल्याने लहान मुले घरात पालकांना हैराण करत आहेत. तर काही पालक हे वर्क फ्रॉम होम करत असतील तर त्यांनाही मुलांच्या गोंधळामुळे काम करण्याची अडचण होत असेल. अशात पालक आणि मुलांमध्ये घरात वाद-चिडचिड होते. घरातील ही स्थिती पाहता WHO ने आई-वडिलांसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.
मुलांसोबत घालवा क्वालिटी टाइम
पॅरेंट्सनी त्यांच्या मुला-मुलींसोबत क्वालिटी टाइम घालवण्याचा वेळ ठरवून घ्यावा. पालकांनी मुलांना विचारावं की, त्यांना रिकाम्या वेळेत काय करायचं आहे आणि कमीत कमी 20 मिनिटे मुलांसोबत नक्की घालवा. मुलांसोबत पुस्तके वाचा, इनडोअर गेम्स खेळा, एक्सरसाइज करा. त्यासोबतच मुलांसोबत चांगल्या मुव्ही बघू शकता किंवा त्यांच्यासोबत कुकिंग करू शकता.
सकारात्मक भाषा
लहान मुलांसोबत सकारात्मक भाषा वापरणं कधीही चांगलं असतं. याने त्यांचा विश्वास वाढतो. त्यांना हे लक्षात येईल की, ते काय करतात यावर तुमचं लक्ष आहे आणि तुम्ही जे करता त्याबाबत तुम्हाला काळजी आहे. WHO मत आहे की, एक लहान मूल गप्प राहू शकत नाही. पण जर तुम्ही थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवाल तर तेही तुमच्या कामाला समजून घेतील.
रूटीन तेच ठेवा
लहान मुलांसोबत रूटीनचं पालन करून दिवस घालवा. बच्चे कंपनीला याची जाणीव करून द्या की, रिकाम्या वेळेत तुम्ही त्यांच्याशी नक्की बोलणार. त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करा. सोबतच त्यांच्यासोबत जेवण करा आणि एक्सरसाइजही करा. त्यांचं रूटीन बदलू देऊ नका.
वाईट वागणं कसं रोखाल?
जर तुमची लहान मुलं घरात राहून तुमच्यासोबत वाईट किंवा चुकीचं वागत असतील तर त्यांना शांतपणे समजावा, त्यांच्यावर थेट रागावू नका. त्यांना त्यांच्या वाईट वागण्यासाठी शिक्षा देण्याआधी त्यांना नियमांचं पालन करण्याचा पर्याय द्या. नंतर त्यांना काहीतरी चांगलं करण्याची संधी द्या आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करा.
स्ट्रेस मॅनेजमेंटची योग्य पद्धत
घरात बंद असलेल्या लोकांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट फार गरजेचं आहे. दिवसातून 5 मिनिटे स्वत:साठी वेळ काढा. थोडा वेळ काहीच न करता शांत बसा, एक्सरसाइज करा, मोठा श्वास आत-बाहेर करा याने तणाव कमी होण्यास मदत मिळेल. लहान मुलांचं बोलणं ऐकून घ्या आणि समजण्याचा प्रयत्न करा. चिडचिड न करता शांत रहा.
कोरोनाबाबत मोकळेपणाने बोला'
लहान मुलं सुद्धा कोरोनाबाबत चर्चा करू लागले आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत कोरोनाबाबत बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. व्हायरसपासून बचावासाठी लोक काय करत आहेत आणि भविष्यात याबाबत काय केलं जाऊ शकतं याबाबत त्यांच्याशी बोला.