मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी ठेवता की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:05 PM2017-09-28T17:05:43+5:302017-09-28T17:11:58+5:30

..कि ‘आळशी’ म्हणून त्यांच्यावर कायम आरडाओरडच करता?

Do you ever praise your children? | मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी ठेवता की नाही?

मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी ठेवता की नाही?

Next
ठळक मुद्देमुलांना छोटे छोटे टास्क द्या. ते त्यांनी पूर्ण केले तर लगेच त्यांचं कौतुकही करा.न केलेल्या गोष्टींवर चिडचिड करण्यापेक्षा ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं बक्षीस आधी मुलांना द्या.आपली नेहेमीची अत्यावश्यक कामं झाल्यानंतरच करमणूक किंवा मौजमजेच्या गोष्टींना परवानगी द्या.

- मयूर पठाडे

तुमच्या घरात किती मुलं आहेत? नुसती लहानच नाहीत, मोठीही. म्हणजे कॉलेजला वगैरे जाणारी. तुमच्या घरात मूल किंवा मुलं असतील, तर तुमची (बहुदा) तक्रार असणारच.. मुलं अजिब्बात ऐकत नाहीत. त्यांना काही म्हणता काही शिस्त नाही.. सगळीकडे नुस्ता पसारा. आपल्या स्वत:च्या गोष्टीही जबाबदारीनं करीत नाहीत. रात्री उशिरा झोपायचं, सकाळी केव्हाही उठायचं.. साधं आपलं अंथरुणही आवरुन ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्टीत नुसता आळस भरलेला.. एक गोष्ट वेळच्या वेळी होत असेल तर शप्पथ..
का करतात मुलं आळशीपणा? त्यांच्यातला आळस कसा घालवायचा?.. प्रत्येक पालकापुढे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. खास त्यांच्याचसाठी या काही महत्त्वाच्या गोष्टी..
पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची सवय एका रात्रीतून लागत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. तसे प्रयत्न पालकांनाही करावे लागतील आणि मुलांनी तसं वागावं यासाठी त्यांना तयारही करावं लागेल. अर्थातच सुरुवात आपल्यापासून करावी लागेल.
मुलांना अगोदर छोटे छोटे टास्क द्या. ते त्यांनी पूर्ण केले तर लगेच त्यांचं कौतुकही करा. न केलेल्या गोष्टींवर चिडचिड करण्यापेक्षा ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं कौतुकरुपी बक्षीस आधी मुलांना द्या.
आपली नेहेमीची अत्यावश्यक कामं झाल्यानंतरच करमणूक किंवा मौजमजेच्या गोष्टींना त्यांना परवानगी द्या. म्हणजे मोबाईल, व्हीडीओ गेम्स, टीव्ही.. वगैरेसारख्या गोष्टी त्यांची रोजची कामं पूर्ण झाल्यानंतरच त्यांना मिळायला हवीत. त्यासाठी थोडा कठोरपणा आपल्याला घ्यावा लागला तरी बेहतर, पण आपणही शिस्तीचं हे सूत्र पाळायला हवं. ते काही फक्त मुलांसाठी नाही.
मुलं काय करतात, काय काय त्यांनी केलं आहे, यावर अगदी घारीची नजर नाही ठेवली, तरी ते काय करताहेत याकडे थोडं लक्ष द्या आणि अधूनमधून त्यांना त्याची जाणीवही करून देत जा.
त्यांच्यावर जी काही जबाबदारी सोपवली असेल, ती जर मोठी असेल, एकाच टप्प्यात ती पार पाडण्यापेक्षा त्याचे छोटे छोटे भाग त्यांना करून द्या.
त्यांना दिलेलं टास्क त्यांच्या वयानुसार आणि त्यांना झेपणारं असलं पाहिजे. ते त्यांनी केलं की त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की द्या.. बघा, तुमचं आळसावलेलं मूल कसं चटपटीत होईल ते..

Web Title: Do you ever praise your children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.