एखाद्याला सॉरी म्हणताना करु नका या चुका, नातं आणखीन बिघडू शकतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:47 PM2023-08-21T13:47:40+5:302023-08-21T13:48:28+5:30
Relationship : 'सॉरी' हा तसा फारच छोटा शब्द आहे पण आपली चुकी असल्यावर हा शब्द बोलण्याची हिंमत प्रत्येकात नसते.
Relationship : नातं जेव्हा खास असतं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरुन अनेकदा भांडणं होत असतात. पण चांगला जोडीदार तोच मानला जातो जो त्याची चूक असेल तर मान्य करतो किंवा समोरच्याला क्षमा करण्यासाठी तयार असतो. 'सॉरी' हा तसा फारच छोटा शब्द आहे पण आपली चुकी असल्यावर हा शब्द बोलण्याची हिंमत प्रत्येकात नसते. जर तुमचाही पार्टनर तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज असेल आणि त्याचा राग दूर करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.
क्षमा मागा आरोप करु नका
या गोष्टीची काळजी घ्या की, माफीला आरोपात बदलू देऊ नका. अनेकदा असे होते की, माफी मागताना काही लोक हेही बोलतात की, तू असं का केलं किंवा तसं का केलं. तसेच "मी जे बोललो त्यासाठी सॉरी पण याची सुरुवात तूच केली होती. तेव्हाच मी असं केलं", असेही बोलले जाते. अशाप्रकारचं बोलणं हे माफीपेक्षा आरोपाकडे जास्त इशारा करतात.
चुकीची जाणीव असायला हवी
माफी मागण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकीची जाणीव असायला हवी. माफी मागण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे सॉरी म्हणने, पण जोपर्यंत तुम्ही तुमची चूक मान्य करणार नाही आणि आधी स्वत:ला माफ करणार नाही तोपर्यंत समोरचाही तुम्हाला माफ करेल की नाही हे सांगता येत नाही.
योग्य शब्दांचा आणि वाक्यांचा वापर
आपल्या चुकीची माफी मागण्यासाठी फिरवून फिरवून बोलणे, इकडच्या तिकडच्या गोष्टींचा वापर न केल्यास बरं होईल. याने समोरच्याला तुम्ही अजिबात सिरिअस नाहीत हे कळून येईल. त्यामुळे सरळ थेट आणि स्पष्ट शब्दात आपली चूक मान्य करा आणि सॉरी म्हणा.
माफीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका
ज्या व्यक्तीला तुम्ही माफी मागणार आहात त्या व्यक्तीला हे स्पष्ट सांगा की, तुम्ही चूक का मान्य करत आहात. याने समोरच्या व्यक्तीला तुम्हाला माफ करण्यात अडचण येणार नाही. एखादी खोटी गोष्ट रचून किंवा खोट्याचा आधार घेऊन समोरच्याची माफी मागाल तर तुम्हीच फसाल. तुम्ही तुमची शेवटची संधी गमावू शकता.
चूक मान्य करा
जर तुमच्याकडून काही चुकी झाली असेल ती मान्य करण्यात काहीच गैर नाहीये. अनेकजण आपल्यातील दोष स्वीकार करण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांचं माफी मागणं दिखावा किंवा अविश्वसनीय वाटतं. तसेच समोरच्या व्यक्तीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करा.