उतरवा मुलाला ‘हरभऱ्याच्या झाडावरून’..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 04:22 PM2017-09-29T16:22:58+5:302017-09-29T16:29:00+5:30
त्यावरुन ‘पडलं’ तर मग पुन्हा कधीच ‘उभं’ राहणार नाही..
- मयूर पठाडे
मुलांना मारू नये, त्यांच्यावर चिडचिड करू नये, रागाच्या भरात त्यांना अद्वातद्वा बोलू नये.. कायम त्यांच्याशी गोड आणि प्रेमानंच बोलावं, हे सगळं सगळं खरं.. पण मुलांनी काहीही केलं तरी त्याला ‘बरोबर’च म्हटलं पाहिजे आणि त्यांचं ‘कौतुक’च केलं पाहिजे असं थोडीच आहे?..
अनेकदा आपण मुलांचं वारेमाप कौतुक करतो. तो जे काही करतोय, त्यानं जे काही केलंय ते किती भारी आहे, याबद्दल आपण त्यांना इतकं काही हरभऱ्याच्या झाडावर चढवतो, की मुलांनाही वाटायला लागतं आपण फारच ‘भारी’ आहोत. शिवाय वेगळं काही करण्यासाठी त्यांना मोटिव्हेशनही मिळत नाही. सततच्या कौतुकामुळे आपल्यासारखे आपणच ही भावना तर त्यांच्या मनात तयार होतेच, पण पुढे जाण्याचे त्यांचे रस्तेही बंद होतात. त्यांचे हे रस्ते आपणच बंद केलेले असतात.
त्यासाठी मुलांना चॅलेंजेस दिलीच पाहिजेत. अर्थातच ही आव्हानं त्यांना पेलणारी आणि त्यांच्या आवाक्यातली असावीत. मूल कितीही हुशार असलं तरी त्याला काही प्रेरणा लागताताच. त्यांच्यासमोर वेगवेगळी आव्हानं ठेवताना ती पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद किती उच्च कोटीचा असतो, हेही मूलांना कळायला हवं असतं. ते कळलं की मुलं स्वत:हून नवनवी आव्हानं स्वीकारतात
या आव्हानांशी झगडताना ती कदाचित पडतील, सुरुवातीला अपयश येईल, पण म्हणून ती आव्हानंच नकोत, असंही नको. पुन्हा उभं राहून या आव्हानांचा सामना करणं मुलांना शिकवलं पाहिजे. पण त्यांचं त्यांना लढू द्या, उभं राहण्याची उभारी त्यांना जरूर द्या, पण सगळ्याच गोष्टी त्यांना बोट धरुन शिकवू नका. नाहीतर पडण्यातली आणि पुन्हा उभं राहण्यातली, साºया आव्हानांना तोंड देण्यातली गंमत त्यांना कधी कळायचीच नाही..
कळू द्या त्यांना ती गंमत.. आणि त्यातला आनंद.. ती ऊर्जा मग त्यांना आयुष्यभर पुरेल..